July 21, 2026 8:02 pm

आंबेगावच्या पूर्व भागातील शेतकऱ्यांसाठी दिलासा! पशुसंवर्धन विभागाकडून १०० टक्के अनुदानावर संकरित मका व शुगरग्रेज बियाण्यांचे वाटप

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

पारगाव, प्रतिनिधी : आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील पशुपालक शेतकऱ्यांना वर्षभर दर्जेदार हिरवा चारा उपलब्ध व्हावा आणि पशुधनाचे पोषण अधिक सक्षम व्हावे, या उद्देशाने पशुसंवर्धन विभागाच्या वतीने जिल्हा परिषद वैरण विकास योजना २०२६ अंतर्गत वडगावपीर (ता. आंबेगाव) येथे १०० टक्के अनुदानावर संकरित मका व शुगरग्रेज बियाण्यांचे वाटप करण्यात आले. या उपक्रमाला परिसरातील शेतकऱ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

वडगावपीर येथील पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी-१ येथे आयोजित कार्यक्रमात लोणी, वडगावपीर, वाळुंजनगर, धुमाळस्थळ आणि मांदळेवाडी परिसरातील एकूण ९३ पात्र शेतकऱ्यांना पंचायत समिती सदस्या अंकिता वाळुंज यांच्या हस्ते ३०५ किलो संकरित मका आणि ३० किलो शुगरग्रेज बियाण्यांचे मोफत वाटप करण्यात आले.

यावेळी बोलताना उपस्थित मान्यवरांनी हिरव्या चाऱ्याचे पशुपालनातील महत्त्व अधोरेखित केले. हवामानातील बदल, चाऱ्याची टंचाई आणि वाढते पशुपालन खर्च लक्षात घेता अशा योजनांमुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार असून, पशुधनासाठी वर्षभर पौष्टिक हिरवा चारा उपलब्ध होण्यास मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

या योजनेमुळे शेतकऱ्यांचा चारा उत्पादनावरील खर्च कमी होण्यास मदत होणार असून, दूध उत्पादनात वाढ, जनावरांचे आरोग्य सुधारणा आणि पशुपालन व्यवसाय अधिक सक्षम होण्यास हातभार लागणार आहे. शासनाच्या अशा लोकाभिमुख योजनांचा लाभ पात्र शेतकऱ्यांनी घ्यावा, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.

या कार्यक्रमास बबन पानसरे, पशुसखी संध्या खंडागळे, लोणीचे उपसरपंच राजेंद्र वाळुंज, लौकिक खंडागळे, विजय आढाव, किरण कौटकर, बन्सी लंके, आण्णा पोखरकर यांच्यासह परिसरातील शेतकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

छायाचित्र ओळ : वडगावपीर (ता. आंबेगाव) येथे पशुसंवर्धन विभागाच्या वतीने जिल्हा परिषद वैरण विकास योजना २०२६ अंतर्गत ९३ शेतकऱ्यांना पंचायत समिती सदस्या अंकिता वाळुंज यांच्या हस्ते १०० टक्के अनुदानावर संकरित मका व शुगरग्रेज बियाण्यांचे वाटप करण्यात आले.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!