मोबाईलवर युट्यूबवरील गाणी पाहत व हेडफोन लावून प्रवाशांना घेऊन रिक्षा चालवणाऱ्या एका रिक्षाचालकाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.संबंधित प्रकारामुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून वाहतूक विभागाने याची गंभीर दखल घेण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एमएच ५० एम २६५४ क्रमांकाची रिक्षा चालक मोबाईल रिक्षाच्या हँडलला अडकवून त्यावर गाणी पाहत रिक्षा चालवत असल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे चालकाने कानात हेडफोन घातले असल्याने रस्त्यावरील इतर वाहनांचे हॉर्न किंवा इशारे ऐकू न येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे हा प्रकार प्रवाशांच्या जीवाशी खेळणारा असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
सध्या अनेक रिक्षाचालक प्रवाशांना योग्य ठिकाणी पोहोचवण्यासाठी गुगल मॅपचा वापर करतात. मात्र कराडसह अनेक शहरांमध्ये स्थानिक रस्ते तोंडपाठ असतानाही काही चालक मोबाईलवर व्हिडिओ किंवा गाणी सुरू ठेवून वाहन चालवत असल्याचे प्रकार वाढत असल्याची नागरिकांची तक्रार आहे.
वाहन चालवताना मोबाईलचा वापर करणे हे वाहतूक नियमांचे उल्लंघन मानले जाते. अशा प्रकारांमुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. संबंधित व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नागरिकांनी वाहतूक विभागाने अशा निष्काळजी चालकांवर कारवाई करावी तसेच रिक्षाचालकांना समुपदेशन व जनजागृतीद्वारे योग्य ती समज द्यावी, अशी मागणी केली आहे.











