पतीपासून विभक्त राहणाऱ्या ४० वर्षीय महिलेवर शेजारी राहणाऱ्या व्यक्तीने धमकी देत वारंवार अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार पातूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात उघडकीस आला आहे.
याप्रकरणी आरोपीविरुद्ध बलात्कार, धमकी तसेच जबरदस्ती गर्भपाताशी संबंधित गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रवीण (३५) याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस) तसेच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार २४ मे २०२६ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला.
पीडित महिलेच्या जबाबानुसार, आरोपीने गेल्या दोन वर्षापासून धमकी देत तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप आहे.
पीडिता गर्भवती राहिल्यानंतर आरोपीने तिला गर्भपाताच्या गोळ्या घेण्यास भाग पाडल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. गोळ्या घेतल्यानंतर तिची प्रकृती बिघडल्याने सुरुवातीला स्थानिक रुग्णालयात उपचार करण्यात आले.
त्यानंतर तिला जिल्हा सर्वोपचार रुग्णालय, अकोला येथे दाखल करण्यात आले असून, तिच्यावर विशेष उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.











