वैद्यकीय प्रवेश परीक्षा ‘नीट’ पेपरफुटी प्रकरणात सीबीआयकडून कसून तपास सुरू आहे. या प्रकरणातील तपास जसजसा पुढे सरकत आहे, तसतसे नवीन गौप्यस्फोट होत आहेत.पेपर फुटी प्रकरणातील आरोपी शिवराज मोटेगावकर हा अत्यंत व्यावसायिक पद्धतीने हे रॅकेट चालवत असल्याची धक्कादायक माहिती तपास यंत्रणांच्या हाती लागली आहे.
लातूरमधील नामांकित ‘आरसीसी’ (RCC) इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून हे नेटवर्क सक्रिय होते. नीट परीक्षेत ‘यश’ मिळवून देण्याची गॅरंटी दिली जात असल्याचेही समोर आले आहे. पेपर फुटीच्या या रॅकेटमध्ये “पहिले काम, मग पैसे” या फॉर्म्युल्यावर ५ लाखांपासून ते थेट ३० लाखांपर्यंतचे डीलिंग होत असल्याचा दावा तपास यंत्रणांनी केला आहे.
तपास यंत्रणांमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लातूरमधील प्रीमियम नीट कोचिंग संस्था असलेल्या ‘आरसीसी’ इन्स्टिट्यूटमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांची आर्थिक क्षमता आधी तपासली जायची. त्यानंतर एजंट्समार्फत पालकांशी संपर्क साधून “सिलेक्शनची १००% गॅरंटी” दिली जायची. परीक्षेपूर्वी पालकांकडून केवळ ‘टोकन मनी’ (अनामत रक्कम) घेतली जायची. धक्कादायक बाब म्हणजे, आपली मुलं डॉक्टर व्हावीत यासाठी अनेक डॉक्टर पालक या रॅकेटला ‘ब्लँक चेक’ देण्यासही तयार होते.
या रॅकेटची कार्यपद्धती अत्यंत सुरक्षित होती. परीक्षेनंतर मुख्य प्रश्नपत्रिकेतील प्रश्न आणि आधी पुरवण्यात आलेल्या प्रश्नसंचातील प्रश्न एकच असल्याची खात्री पटल्यावरच मोठी रक्कम ट्रान्सफर केली जात होती. मात्र, यावेळेस फिजिक्सचा (भौतिकशास्त्र) मूळ पेपर आणि एजन्सीने दिलेला प्रश्नसंच वेगवेगळा आल्याची तक्रार काही पालकांनी केली आणि या संपूर्ण रॅकेटचे गुपित समोर आले. अनेक नामांकित डॉक्टरांची मुलं ‘आरसीसी’मध्ये शिकत असल्याने आता हे डॉक्टर पालकही तपास यंत्रणांच्या रडारवर आले आहेत.
नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या (NTA) २०२४ च्या आकडेवारीनुसार, लातूरमधून २४,४९६ विद्यार्थी नीट परीक्षेला बसले होते. त्यापैकी तब्बल १,२४५ विद्यार्थ्यांना ६०० पेक्षा जास्त, ३७६ विद्यार्थ्यांना ६५० पेक्षा अधिक, २५ विद्यार्थ्यांना ७०० पेक्षा जास्त, तर ५ विद्यार्थ्यांनी ७१० गुणांचा टप्पा पार केला होता. या अद्भूत यशाची चर्चा संपूर्ण देशात झाली होती. मात्र, आता मोटेगावकरच्या रॅकेटचा पर्दाफाश झाल्यामुळे लातूरच्या गेल्या काही वर्षांतील ‘नीट’ निकालांच्या विश्वासार्हतेवर आणि यशावर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.











