‘उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्याशी संबंधित बाबा म्हणून अशोक खरातवर तातडीने कारवाई करण्यात आली. मात्र, खरात प्रकरणात भारतीय जतना पक्षाचे आमदार आणि मंत्र्यांचा सहभाग असता तर खरातवर कारवाई झाली असती काय,’ असा सवाल अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राष्ट्रीय महासंघटक प्रा. श्याम मानव यांनी सोमवारी उपस्थित केला.
‘खरातच्या साथीदार असलेल्या रूपाली चाकणकर यांना सहआरोपी करून घेत त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा,’ अशी मागणीही त्यांनी केली.
अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे ‘बुवाबाजीविरोधी अभियानां’तर्गत आयोजित ‘बुवा तेथे बाया, खरातसारख्या बाबाला स्त्रिया का बळी पडतात?’ या विषयावर प्रा. श्याम मानव यांचे व्याख्यान झाले. त्यावेळी ते बोलत होते. सामाजिक कार्यकर्ते अन्वर राजन, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे, समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष मधुकर कांबळे, कार्याध्यक्ष सुरेश झुरमुरे या वेळी उपस्थित होते.
प्रा. मानव म्हणाले, ‘खरातने शुद्धिकरण प्रक्रियेच्या नावाखाली गेल्या वीस वर्षांत एक हजार स्त्रियांवर अत्याचार केला असण्याची शक्यता आहे. त्याने चिंचोके पॉलिश करून रत्न म्हणून विकले. इशान्येश्वर मंदिरात पूजेसाठी अनेकांकडून पाच कोटी रुपये घेतले. मी गुन्हा केला नाही तर धार्मिक विधीनुसार संबंध ठेवले, असे खरात म्हणतो. या सगळ्या प्रकरणांमध्ये चाकणकर आणि मंदिराच्या विश्वस्तांनी मदत केली आहे. त्यामुशे या सर्वांवर तातडीने गुन्हा दाखल झाला पाहिजे.’
‘मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या इशाऱ्याशिवाय पोलीस काम करत नाहीत. मात्र, प्रसारमाध्यमांनी पाठपुरावा केला म्हणून खरात प्रकरण उघड झाले आणि पोलिसांना कारवाई करावी लागली,’ असा टोला मानव यांनी लगावला. ‘महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री भोंदू बागेश्वर बाबाच्या पायावर डोके ठेवतात,’ अशी टीका त्यांनी फडणवीस यांच्यावर केली.
‘वारकरी संप्रदायामध्ये घुसखोर शिरले आहेत हे ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे विधान राहुल भंडारे यांनी सत्य करून दाखविले. ज्ञानोबा-तुकोबांची गादी चालविणाऱ्या वारकऱ्यांना अशांकडून १६ संस्कार शिकण्याची गरज नाही,’ अशी टीका विकास लवांडे यांनी केली.











