नागपूरची वाडी परिसरातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. इथं एका तरुणाने पत्नीच्या त्रासाला कंटाळून भयंकर पाऊल उचललं आहे. यामुळे त्यांचा १२ वर्षांचा संसार उद्ध्वस्त झाला आहे.
तसेचं मुलंही पोरकी झाली आहेत. विशेष म्हणजे दोघांनी १२ वर्षांपूर्वी प्रेमविवाह केला होता. त्यांना मुलंही झाली होती. संसाराचा गाडा सुरळीत सुरू होता.
मात्र मागच्या काही काळापासून सतत होणारे घरगुती वाद, क्षुल्लक कारणांवरून वारंवार घर सोडून जाणं, परपुरुषासोबत फोनवर बोलणं, अशा पत्नीच्या वागणुकीला कंटाळून एका ३४ वर्षीय पतीने गळफास लावून जीवन संपवलं आहे. नागपूरच्या वाडी परिसरात ही घटना घडली. मनीष देवानंद देशभ्रतार (वय ३४, रा. रघुपतीनगर, वाडी) असं मृत पतीचं नाव आहे. याप्रकरणी वाडी पोलिसांनी मृत मनीषच्या पत्नीविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मनीष देशभ्रतार यांचा १२ वर्षांपूर्वी मीना (नाव बदललं आहे) नावाच्या तरुणीसोबत प्रेमविवाह झाला होता. त्यांचा संसार सुखाने सुरू होता आणि त्यांना या संसारातून दोन मुलेही आहेत. मात्र, गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या सुखी संसाराला गालबोट लागले. मीना ही सतत मोबाईलवर कोणाशीतरी बोलत असायची. याच कारणावरून पती-पत्नीत वारंवार खटके उडू लागले आणि त्यांच्यातील वाद विकोपाला गेले.
१४ मार्च रोजी मीना अचानक एका अज्ञात युवकासोबत घर सोडून निघून गेली. पत्नी बेपत्ता झाल्याने मनीषने तिचा सर्वत्र शोध सुरू केला. अखेर ती आंध्र प्रदेशातील विजयवाडा येथे असल्याचे समजल्यानंतर मनीषने तेथे जाऊन तिची समजूत काढली आणि तिला परत नागपूरला आणले. मात्र, परत आल्यानंतरही मीना मनीषसोबत राहण्यास तयार नव्हती. ती सातत्याने वाद घालत राहिली आणि एप्रिल महिन्यात ती पुन्हा आपल्या माहेरी निघून गेली.
मीना केवळ मनीषसोबत राहण्यास नकार देत नव्हती, तर ती आपल्या दोन्ही मुलांची जबाबदारी स्वीकारण्यासही तयार नव्हती. पत्नीचे असे वागणे आणि मुलांचे भविष्य या चिंतेमुळे मनीष प्रचंड मानसिक तणावाखाली होते. याच नैराश्यातून अखेर २० एप्रिल रोजी मनीष यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली.
मनीषच्या आत्महत्येनंतर वाडी पोलिसांनी सुरुवातीला अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. मात्र, मनीषची आई कविता देवानंद देशभ्रतार (वय ५६) यांनी पोलिसांत धाव घेत सून मीनाविरुद्ध रीतसर तक्रार दाखल केली. मीनाने मनीषचा प्रचंड मानसिक छळ केला आणि त्याला आत्महत्येस प्रवृत्त केले, असा थेट आरोप आईने तक्रारीत केला. या तक्रारीच्या आधारे वाडी पोलिसांनी प्राथमिक चौकशी पूर्ण करून आरोपी पत्नी मीनाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.











