विदर्भातील जंगलातून सह्याद्रीच्या दाट अरण्यात आणलेल्या चंदा, तारा आणि हिरकणी या तीन वाघिणींवर वन विभागाची बारकाईने नजर होती. त्यासाठी त्यांच्या गळ्यात रेडिओ कॉलर बसवण्यात आले.
मात्र, काही दिवसांपूर्वी हिरकणीचे जीपीएस सिग्नल अचानक एका जागी स्थिरावले आणि वनविभागाची धडधड वाढली. अखेर ट्रॅप कॅमेऱ्यांत ती सुखरूप दिसली खरी, पण तिच्या गळ्यातील कॉलर गायब होते. त्यामुळे स्थलांतरित वाघिणींच्या सुरक्षेसाठी ही धोक्याची घंटा तर नाही ना, अशी चर्चा आता वन्यजीव वर्तुळात सुरू झाली आहे.
शांत जंगल आणि प्रत्येक हालचालीवर नजर ठेवणारे ट्रॅप कॅमेरे.. गेल्या दहा दिवसांपासून सह्याद्री व्याघ्रप्रकल्पातील ‘हिरकणी’ उर्फ ‘एसटीआर-टी६’ चा वाघिणीचे सॅटेलाईट जीपीएस सिग्नल एकाच जागी स्थिरावले. ते मागे, पुढे कुठेच दाखवत नसल्याने सह्याद्री व्याघ्रप्रकल्पाची चिंता मात्र वाढली. व्याघ्रप्रकल्पाच्या गस्ती पथकाने मोठा परिसर पालथा घातला, पण ‘रेडिओ कॉलर’ लावलेल्या या वाघिणीचा ठावठिकाणा मात्र सापडत नव्हता. या रेडिओ कॉलरमध्ये तांत्रिक बिघाड झाला का, ती गळून तर नाही पडली याबाबत विविध तर्कवितर्क सुरू झाले.
‘हिरकणी’ या वाघिणीला ‘रेडिओ कॉलर’ लावली असली तरीही जंगलात वाघांच्या हालचालींवर नजर ठेवण्यासाठी ‘ट्रॅप कॅमेरे’ देखील लावण्यात आले आहेत. ‘रेडिओ कॉलर’ अपयशी ठरले असले तरीही ट्रॅप कॅमेऱ्यांनीच या रहस्यावरील पडता उचलला. कोयनेच्या गाभा क्षेत्राात म्हणजेच कोअर भागात रविवारी एक वाघीण निवांतपणे फिरताना दिसून आली. तिच्या अंगावरील पट्ट्यांचे बारकाईने निरीक्षण आणि विश्लेषण केल्यानंतर ती दुसरी-तिसरी कुणीही नसून ‘हिरकणी’च असल्याचे स्पष्ट झाले. मात्र, तिच्या गळ्यात रेडिओ कॉलर दिसून आली नाही. ट्रॅप कॅमेऱ्यात ती झाडांच्या खोडावर मूत्र फवारुन स्वत:ची हद्द निश्चित करत असल्याच्या खुणाही दिसून आल्या आहेत. ती नव्या अधिवासाशी जुळवून घेत असल्याचे हे संकेत मानले जात आहेत.
हिरकणीने स्वतःच्या पंज्याने कॉलर काढून टाकली असण्याची शक्यता सह्याद्री व्याघ्रप्रकल्पाचे संचालक तुषार चव्हाण यांनी व्यक्त केली. काही तांत्रिक कारणामुळे ती गळून पडली असावी, असाही अंदाज व्यक्त केला जात आहे. विशेष म्हणजे, कॉलर अजूनही अधूनमधून सिग्नल देत असल्याने ती जंगलातच कुठेतरी पडलेली असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, कॅमेऱ्यात कैद झालेल्या हिरकणीची तब्येत सुदृढ दिसत असल्याने सह्याद्री व्याघ्रप्रकल्पाने सुटकेचा निश्वास सोडला आहे. तिचे वजनही वाढल्याचे प्रथमदर्शनी जाणवत असल्याची माहिती मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे यांनी दिली.











