मध्यप्रदेशच्या एक धक्कादायक घटना घडली आहे. एका नराधम व्यक्तीने आपल्या पत्नीची निर्घृण हत्या केल्यानंतर, दोन वर्षांच्या चिमुरड्या मुलाला घनदाट जंगलात नेऊन सोडले. हिंस्त्र प्राण्यांचा वावर असलेल्या या परिसरात या चिमुकल्याने तब्बल 20 तास अनवाणी आणि उपाशीपोटी पायपीट केली.
रविवारी सकाळी पोलिसांनी या चिमुरड्याला अत्यंत अशक्त अवस्थेत शोधून काढले. तहानेने व्याकुळ झालेल्या या बालकाला पाहताच पोलिसांनी त्याला पाणी आणि अन्न दिले त्यानंतर त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.
‘टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, विदिशा जिल्ह्यातील हैदरगड परिसरातील शनिवारी दुपारी एका 25 वर्षीय नराधमाने आपल्या पत्नीची दगडाने ठेचून हत्या केली. हत्येच्या वेळी हा दोन वर्षांचा मुलगा तिथेच उपस्थित होता. गुन्हा केल्यानंतर आरोपीने आपल्या मुलाला दुचाकीवर बसवून 2 किमी दूर असलेल्या रायसेन जिल्ह्यातील बेगमगंज वनक्षेत्रात नेले. तिथे एका ओढ्याजवळ मुलाला सोडून आरोपीने दुचाकी तिथेच टाकली आणि पळ काढला. या परिसरात दाट झाडी आणि हिंस्त्रप्राण्यांचा वावर असल्यामुळे इतक्या लहान बालकाचे या जंगलात राहणे भीतिदायक होते. कोणत्याही क्षणी एखादा वन्यप्राणी त्याच्यावर हल्ला करू शकला असता, मात्र ‘देव तारी त्याला कोण मारी’ या उक्तीचा प्रत्यय येथे आला.
या प्रकरणातील हत्येची माहिती मिळताच पोलिसांनी तपास सुरू केला. यादरम्यान पत्नीचा मृतदेह सापडल्यानंतर पोलिसांनी संशयित पतीला ताब्यात घेतले. पोलिसांनी त्याची चौकशी केली असता, सुरुवातीला त्याने मुलाबद्दल कोणतीही माहिती न देता तपासाची दिशा भरकटवण्याचा प्रयत्न केला. यामुळे बचावकार्यात विलंब झाला. मात्र, नातेवाईकांशी संपर्क साधल्यानंतर मुलगा बेपत्ता असल्याचे स्पष्ट झाले आणि पोलिसांनी तातडीने शोधमोहीम सुरू केली. रात्रभर बॅटरीच्या प्रकाशात पोलीस पथके आणि स्थानिक ग्रामस्थ शेतात, विहिरींच्या परिसरात व जंगलात मुलाचा शोध घेत होते. अखेर रविवारी सकाळी साडेआठच्या सुमारास जंगलातून एका लहान मुलाच्या रडण्याचा आवाज आला आणि त्या चिमुकल्याचा शोध लागला.
बेगमगंजच्या एसडीपीओ सोनाली गुप्ता यांनी या घटनेबद्दल माहिती दिली. त्या म्हणाल्या की, मुलाला जिथे सोडले होते तिथून तो 2 किमी चालत पुढे आला होता. जंगलात जनावरांची भीती होती मात्र त्यातूनही तो सुरक्षित वाचला. हा लहान मुलगा आपल्या आईच्या हत्येचा एकमेव प्रत्यक्षदर्शी असून, त्याने दिलेली ही झुंज एखाद्या चमत्कारापेक्षा कमी नाही. सध्या मुलाची प्रकृती स्थिर असून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असल्याचे त्यांनी सांगितले.











