जादा पैसे मिळवण्याच्या लोभापायी सायबर चोरट्यांना बँक खाते वापरास दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पेट्रोल पंपावरील व्यवस्थापकासह तिघांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत एकाने मार्केट यार्ड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, पेट्रोल पंपाच्या व्यवस्थापकासह तिघांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आलेला एक आरोपी मूळचा राजस्थानचा आहे. त्याने पेट्रोल पंपावरील व्यवस्थापकास स्कॅनर पाठविण्यास सांगितले होते. त्याद्वारे तो पंपाच्या बँक खात्यात सायबर फसवणुकीच्या गुन्ह्यातील रक्कम जमा करत होता. त्यानंतर गुलटेकडी भागात राहणारा एक आरोपी हा पंपावर यायचा. खात्यात पैसे जमा झाले का ? अशी विचारणा करायचा. पंपावरील व्यवस्थापक मोबाइलवरील ॲपद्वारे हे व्यवहार तपासत होता.
रक्कम जमा झाल्यानंतर पंपावर जमा झालेली रोख रक्कम ही आरोपींना दिली जात होती. या व्यवहारासाठी दहा हजार रुपयांमागे २०० रुपये अतिरिक्त मिळत (कमिशन) होते. त्यापैकी ५० रुपये पंपावरील व्यवस्थापक स्वत:कडे ठेवायचा. उर्वरित १५० रुपये तो पंपावरील कामगारांना वाटत होता.
पेट्रोल पंपावरील व्यवस्थापकाने बाजार समितीच्या पेट्रोल पंपाच्या बँक खात्यात सायबर फसवणुकीतील सात लाख १० हजार १३ रुपये स्वीकारल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. मार्केट यार्ड पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास करण्यात येत आहे.











