May 14, 2026 9:33 pm

पुण्यात जनगणना २०२७ मोहिमेला सुरुवात

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

पुणे : भारताची जनगणना २०२७ अंतर्गत पहिल्या टप्प्यातील घर यादी व घरांची गणना तसेच स्व-गणना (Self Enumeration) प्रक्रिया दिनांक १ मे २०२६ ते १५ मे २०२६ या कालावधीत राबविण्यात येत आहे. या मोहिमेचा शुभारंभ १ मे महाराष्ट्र दिनाच्या औचित्य साधून पुणे महानगरपालिका क्षेत्रात उत्साहात करण्यात आला.

या दिवशी विविध मान्यवरांनी se.census.gov.in या अधिकृत पोर्टलला भेट देऊन स्वतःची स्व-गणना प्रक्रिया पूर्ण केली आणि नागरिकांनाही यात सहभागी होण्याचे आवाहन केले.

या उपक्रमात महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा अजित पवार, केंद्रीय राज्यमंत्री (सहकार व नागरी विमान वाहतूक) श्री मुरलीधर मोहोळ, राज्याच्या नगरविकास, परिवहन, सामाजिक न्याय, वैद्यकीय शिक्षण व अल्पसंख्यांक विकास विभागाच्या राज्यमंत्री श्रीमती माधुरीताई मिसाळ यांनी सक्रिय सहभाग नोंदवला.

तसेच आमदार श्री सिद्धार्थ शिरोळे, श्री हेमंत रासने आणि श्री योगेश टिळेकर यांनीही स्व-गणना पूर्ण करत नागरिकांना या प्रक्रियेत सहभागी होण्याचे आवाहन केले.

पुणे महानगरपालिका च्या वतीने महापौर श्रीमती मंजुषा दीपक नागपुरे, स्थायी समिती अध्यक्ष श्री श्रीनाथ भिमाले, विविध समित्यांचे अध्यक्ष व सदस्य, तसेच अतिरिक्त महापालिका आयुक्त (विशेष) श्री ओमप्रकाश दिवटे आणि अतिरिक्त महापालिका आयुक्त (जनरल) श्रीमती पवनीत कौर यांनीही या मोहिमेत सहभाग घेतला.

या मोहिमेचा उद्देश नागरिकांना डिजिटल माध्यमातून स्व-गणना करण्यास प्रोत्साहित करणे असून, यामुळे जनगणनेची प्रक्रिया अधिक जलद, अचूक आणि पारदर्शक होण्यास मदत होणार आहे.

महानगरपालिकेच्या वतीने नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, त्यांनी दिलेल्या कालावधीत अधिकृत पोर्टलवर जाऊन स्वतःची व आपल्या कुटुंबाची माहिती नोंदवावी आणि या राष्ट्रीय उपक्रमात सक्रिय सहभाग घ्यावा.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!