May 14, 2026 8:52 pm

जागतिक कामगार दिनानिमित्त बांधकाम कामगारांची भव्य रॅली

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

दि. १ मे रोजी ’श्रमिक हक्क आंदोलन’ संघटनेच्या बांधकाम कामगारांनी जागतिक कामगार दिनानिमित्त रॅलीचे आयोजन केले. अण्णाभाऊ साठे पुतळा, स्वारगेट ते कामगार पुतळा या मार्गावरील या रॅलीत पुण्याच्या विविध भागातील शेकडो कामगारांनी सहभाग घेतला. त्यामध्ये काही बांधकाम कामगारांनी प्रतिकात्मक पातळीवर सफाई कर्मचारी, ते फेरिवाले, डिलिव्हरी बॉईज यांचा वेश करुन त्यांना रॅलीत सहभागी करुन घेतल्याने तिला एकुणच कष्टकरी जनतेच्या रॅलीचे स्वरुप आले. नोयडासह गुजरात, महाराष्ट्र अशा विविध ठिकाणी सुरु असलेल्या कामगार लढ्यांना या रॅलीतून ठाम पाठिंबा जाहीर करण्यात आला.

रॅलीमध्ये कामगारांच्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचा समावेश होता. याची सुरुवात कामगारांच्या लेझीम नृत्याने झाली. त्यानंतर ’मी कामगार, मी शिलेदार, जग उभारणारा मी कलाकार’ या एमसी सोशालिस्ट लिखित रॅप गाण्याच्या बीट्सवर कामगारांनी ठेका धरला. चळवळीत नव्याने रॅप गीतांचा फॉर्म घेऊन येणार्‍या ’नव सांस्कृतिक पर्याय’ टीमने यानंतर सादर केलेल्या ’कष्टकरी, कामगार संघटीत व्हावे’ या अभंगाने वातावरण भारावून गेले.

राष्ट्र सेवा दलाचे ज्येष्ठ कार्यकर्ते ॲड. संतोष म्हस्के यांनी कामगार दिन व लाल बावट्याचा इतिहास सांगत हा कामगारांच्या लढ्याचे प्रतिक असल्याचे मांडले. संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती ही कामगारांनीच केली याची आठवण करुन देत देशाला पुढे नेण्याचे कार्यही कामगारांनाच करावे लागणार आहे असे त्यांनी प्रतिपादन केले. श्रमिक हक्क आंदोलनचे अध्यक्ष बी. युवराज यांनी नव्या कामगार कायद्यांनी कामगारांचे शोषण वाढले असून देशभरात कामगारांचे मोठ्या प्रमाणावर उभे राहत असलेले लढे हेच दर्शवित असल्याचे वास्तव निदर्शनास आणून दिले. सरकार धर्मांधतेचा वापर करुन जनतेत फूट पाडायचा प्रयत्न् करत असली तरी कामगारांनी एकजुटीने याचा मुकाबला करण्याची गरज आहे असे मांडले. यावेळेस संघटनेचे सरचिटणीस सागर सविता धनराज यांसह विविध भागातील कामगार प्रतिनिधी व कमिटी सदस्य उपस्थित होते. “लोकशाही वाचवणर कोण? उद्याचा देश घडवणार कोण? आम्ही कामगार, आणखीन कोण!” यासारख्या घोषणांनी रॅलीची सांगता झाली.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!