मे महिन्याच्या पहिल्या दिवशी महाराष्ट्र दिनी सायंकाळी , पुण्यातील गजबजलेल्या गणेशखिंड रस्त्यावर (पोलीस परेड ग्राउंड जवळ ) एक एक नागरिक जमा होत एक मोठी अशी मानवी साखळी तयार झाली होती.
निमित्त होते — गणेशखिंड रस्ता रुंदीकरणासाठी “अडथळा” ठरत असलेल्या रस्त्याच्या कडेला असलेल्या २०० वर्षांचे वट वृक्ष ३५० वर्षांचे औदुंबर अशी एकूण ५२९ झाडे तोडण्याच्या पुणे महानगरपालिकेच्या प्रस्तावाला विरोध.
यासाठी नागरिकांनी सिमला ऑफिस चौक ते पोलीस परेड ग्राउंड ( कृषी महाविद्यालय चौक ) दरम्यान मानवी साखळी उभी केली.
वृक्ष संवर्धन समिती , पुणे च्या वतीने श्री रुपेश केसेकर व श्री समीर निकम यांनी नियोजन केले.
यात शहरातील विविध भागात पर्यावरण विषयी काम करणाऱ्या संस्थाचे प्रतिनिधी , आय टी इंजिनिअर , डॉक्टर, वकील, प्रोफेसर, आर्किटेक्ट , चार्टर्ड अकाउंटंट, योगा टीचर, व्यावसायिक असे विविध क्षेत्रात कार्यरत असणारे नागरिक , तसेच लहान मुले जेष्ठ नागरिक असे जवळपास 300 हुन अधिक नागरिक सहभागी झाले होते.
“निसर्गाशी खेळ, भविष्याशी धोका”, “उष्णतेची लाट इशारा आहे—झाडं वाचवा, उकाडा थांबवा” असे फलक हातात घेत, “झाडे वाचवा, पुणे वाचवा”, “झाडे आमच्या हक्काची—नाही कुणाच्या बापाची” अशा घोषणांनी परिसर दुमदुमला. रस्त्याच्या कडेला झाडांवर लावलेले क्रमांक आणि वृक्षतोडीच्या नोटिसा पाहून नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला. “मेट्रोचे खांब अडथळा नाहीत, पण १००–१५० वर्षे उभी असलेली झाडेच अचानक अडथळा कशी?” असा सवालही उपस्थित करण्यात आला.
५२९ झाडांवर लावलेले क्रमांक पाहून व्यथित झालेले नागरिक पोलीस ग्राउंड लगत असलेल्या नांद्रुक झाडांच्या रांगेच्या शेवटी, एका महाकाय नांद्रुक झाडाखाली एकत्र येत या मानवी साखळीची सांगता करण्यात आली.
या उपक्रमाचे संयोजन पुणेकर नागरिक श्री रुपेश केसेकर आणि श्री समीर निकम यांनी केले होते.
त्यांनी उन्हाळ्याच्या दुपारी सहभागी झालेल्या नागरिकांचे अभिनंदन केले . तसेच पुणे शहरात कुठेही होणाऱ्या वृक्ष तोडी विरोधात सर्व पुणेकरांनी एकजुटीने आवाज उठवला पाहिजे,
“आज २५०पेक्षा अधिक आलेल्या नागरिकांचा आवाज पुणे मनपापर्यंत पोहोचला असेल. आणि नागरिकांच्या मागणीनुसार ही सर्व झाडे वाचवूनच पुढील रस्ता रुंदीकरणाचा निर्णय घेतला जाईल, अशी आशा आहे,” असे रुपेश केसेकर यांनी सांगितले.
यावेळी ‘नागरिक वृक्ष संवर्धन समिती’ स्थापन करण्याची घोषणा करण्यात आली.
पुणे महानगरपालिकेने अद्यापही वृक्ष संवर्धन समितीची नियुक्ती केली नसल्यामुळे, आणि शहरात बेसुमार वृक्ष तोड होत असल्याच्या पार्श्वभूमीवर पुणेकर नागरिकांची स्वतःची अशी ही समिती शहरातील वृक्ष तोडीच्या घटनांवर लक्ष ठेवणार असून येणाऱ्या काळात अधिकाधिक नागरिकांना वृक्ष संबंधित कायद्याचे प्रशिक्षण देण्याचे नियोजन करण्यात येणार असल्याचे समितीचे संयोजक श्री समीर निकम यांनी जाहीर केले.
ही नागरिकांची वृक्ष संवर्धन समिती पूर्णपणे निष्पक्ष रीतीने वृक्ष संवर्धनासाठी , पुण्यातील झाडे वाचवण्यासाठी कार्यरत राहील
ह्या समितीमध्ये कोणत्याही राजकीय पक्ष किंवा NGO ह्यांचा कोणताही सहभाग असणार नाही, असे देखील संयोजकांनी जाहीर केले.
जमलेल्या नागरिकांनी महाकाय अश्या वट वृक्ष, नांद्रुक वृक्षासोबत स्वतःचे फोटो आठवण म्हणून सोबत नेले .
🌱











