कलिंगड खाल्यामुळे एकाच कुटुंबातील ४ जणांचा मृत्यू झाल्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. पण, कलिंगडामुळेच मृत्यू झाला का याबद्दला वैद्यकीय अहवाल बाकी आहे, पण वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जात आहे.पण, ज्या कुटुंबामध्ये ४ जणांचा मृत्यू झाला, त्या घरामध्ये त्या दिवशीचा घटनाक्रम समोर आला आहे.
मुंबईतील पायधुनी येथील घाटी मोहल्ला परिसरात राहणाऱ्या डोकडिया कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. कलिंगड खाल्ल्याने कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला. मोगल उमरेट्टी इमारतीत राहणाऱ्या डोकाडिया कुटुंबातील अब्दुल्ला (४०), नसरीन (३५), आयशा (१६) आणि झैनब (१३) या चौघांचाही या दुर्दैवी घटनेत मृत्यू झाला आहे.
रविवारी रात्री अब्दुल डोकडिया यांच्या दोन्ही भावांच्या पत्नी माहेरी गेल्या होत्या. त्यामुळे घरी बिर्याणी पार्टी ठरली होती. चिकन बिर्याणीसोबतच, ताक, तळलेले पदार्थ (पोंगा), केचप, अशी मेजवानी आयोजित करण्यात आली होती. डोकडिया यांचा ४ जणांचं कुटुंब आहे आणि २ भाऊ आणि त्यांची तीन मुलं असे मिळून ही दावत ठेवण्यात आली होती. दावत सुरू असताना घरगुती गप्पा सुरू होत्या, मोबाईल एक्सेसिरीज व्यवसायसंदर्भात संदर्भात देखील गप्पा झाल्या होत्या. सगळ्यांचं जेवण झाल्यानंतर रात्री ११-१२ च्या दरम्यान दोन्ही भाऊ घरी निघून गेले होते.
त्यानंतर डोकडिया कुटुंबीय रात्री टीव्ही पाहत होतं, टीव्ही पाहत असताना सगळ्यांना भूक लागली. घरात बिर्याणी उरली होती, पण इतक्या रात्री बिर्याणी खाण्याऐवजी कलिंगड खाण्याच्या सगळ्यांनी बेत केला. अब्दुल्ला, नसरीन आणि त्यांच्या दोन मुलांनी कलिंगड खाण्याचा हट्ट केला. त्यामुळे १.३० वाजेच्या सुमारास डोकडिया परिवाराने घरात ठेवलेलं कलिंगड खाल्लं. त्यानंतर पहाटे ५-६ वाजता त्रास व्हायला लागला, अचानक पोट दुखायला लागलं. जुलाब सुरू झाला. आता एवढ्या रात्री खाल्यामुळे पोट दुखत असेल असं समजून सगळ्यांनी ते अंगावर काढलं.
त्यामुळे सकाळ होईपर्यंत कुणीच काही केलं नाही. पण, सकाळी अचानक सगळ्यांची प्रकृती बिघडली, त्यांना उलट्या आणि जुलाब होऊ लागला. प्रकृती बिघडल्यामुळे फॅमिली डॉक्टरांना कळवलं, त्यांनी लगेच घरी धाव घेतली चौघांनाही औषध दिलं. पण, सकाळी प्रकृती तशीच होती, चौघांना जेजे रुग्णालयात दाखल केलं, पण उपचारादरम्यान चौघांचा मृत्यू झाला.
दरम्यान, या प्रकरणात फक्त्त कलिंगडच नाही तर इतर पदार्थ देखील तपासले जाणार आहे. बिर्याणी, बॉटलमधील पाणी आणि मटक्यातील पाण्याचे सॅम्पल जमा केले आहे. जेजे रुग्णालय, FDA, FSL याबद्दलचा तपास करणार आहे. बिर्याणीसह ताक, दही, चटणी, सॉस आणि काही तळलेले पदार्थ जे जेवणासाठी वापरले होते ते सगळे ताब्यात घेतले आहे. यातील फक्त्त बिर्याणी उरली होती तिचे सॅम्पल घेतले असून तपासणी सुरू आहे.
तर, पायधूनी विषबाधा प्रकरणात तपासाला वेग आला आहे. जेजे मार्ग पोलिसांकडून कलिंगड विक्रेत्याला चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. नळ बाजारातून या कुटुंबाने कलिंगड विकत घेतलं होतं. विक्रेत्याने कलिंगड कुठून आणलं होतं, याची देखील चौकशी केली जाणार आहे. पोलिसांच्या 4 टीम्स सध्या पायधूनी परिसरात कार्यरत आहे. अनेक फळ विक्रेत्यांची चौकशी केली जात आहे. फॉरेन्सिक, FDA आणि जेजे रुग्णालयाच्या अहवालची पोलिसांना प्रतिक्षा आहे.











