April 23, 2026 10:22 pm

वरळीतील रस्त्याचे अरुंदीकरण. शिवसेनेचा (ठाकरे) विरोध डावलून प्रस्ताव मंजूर

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

रस्ता रुंदीकरणाचे खूप प्रस्ताव मुंबई महापालिकेसमोर मंजुरीसाठी येत असले तरी वरळीतील एका रुंद रस्त्याच्या अरुंदीकरणाचा प्रस्ताव गुरुवारी पटलावर आला होता. स्थापत्य समिती (शहर) समोर हा प्रस्ताव आला असता शिवसेनेच्या (ठाकरे) नगरसेवकांनी या प्रस्तावाला विरोध केला होता.

मात्र त्यांचा विरोध डावलून समिती अध्यक्ष आणि शिवसेना (शिंदे) पक्षाच्या नगरसेविका यामिनी जाधव यांनी हा प्रस्ताव मंजूर केला. त्यामुळे या निमित्ताने शिवसेनेच्या दोन्ही गटात आरोप – प्रत्यारोपाचा सामना रंगला.

 

वरळी येथील मोहन दामोदर पाटील ते नारायण हर्डीकर मार्ग यादरम्यानच्या रस्त्याच्या अरुंदीकरणाचा प्रस्ताव मुंबई महापालिकेच्या स्थापत्य समिती (शहर) च्या पटलावर मंजुरीसाठी आला होता. सध्या १८.३३ मीटर रुंदीचा हा रस्ता १३.४० मीटर रुंद करण्याबाबतचा हा प्रस्ताव होता. स्थापत्य समिती मध्ये ते प्रस्ताव चर्चेला आला असताना शिवसेनेच्या (ठाकरे) वरळीतील स्थानिक नगरसेविका पद्मजा चेंबूरकर यांनी या प्रस्तावाला आक्षेप घेतला. मात्र अध्यक्ष यामिनी जाधव यांनी हा प्रस्ताव मंजूर केला. यामिनी जाधव या शिवसेना (शिंदे) पक्षाच्या नगरसेविका असून या घटनेनंतर शिवसेनेच्या दोन्ही गटात आरोप – प्रत्यारोप सुरू झाले आहेत. समितीच्या बैठकीनंतर ठाकरेंच्या शिवसेनेच्या नगरसेवकांनी पालिका आयुक्त आश्विनी भिडे यांची भेट घेतली.

हा रस्ता पूर्वीप्रमाणेच रुंद ठेवावा, अशी मागणी आम्ही केली, पण अध्यक्ष यामिनी जाधव यांनी याकडे दुर्लक्ष करून प्रस्ताव मंजूर केला, असे पद्मजा चेंबूरकर यांचे म्हणणे आहे. त्या म्हणाल्या की, या रस्त्याच्या परिसरात तीन चार हजाराची लोकवस्ती आहे. रस्ता अरुंद केला, तर भविष्यात रुग्णवाहिका, अग्निशमन दलाच्या गाड्याही जाऊ शकणार नाहीत. काही दुर्घटना भविष्यात घडली तर रहिवाशांना बाहेरही पडू शकणार नाहीत. यामिनी जाधव यांनी आमचे काहीही ऐकून न घेता प्रस्ताव मंजूर केला, असा आरोप पद्मजा चेंबूरकर यांनी केला.

यामिनी जाधव यांनी मनमानीपणे हा प्रस्ताव मंजूर केल्याचा आरोप विरोधीपक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी केला. स्थापत्य (शहर) समितीच्या अध्यक्षपदी नियुक्त शिवसेनेच्या (शिंदे) नगरसेविका विरोधकांचे म्हणणे ऐकून न घेता ‘हम करे सो कायदा’ या पद्धतीने वागत असल्याचा आरोपही पेडणेकर यांनी केला. चेंबूरकर या मोठ्या मताधिक्याने वरळीतून निवडून आल्या आहेत. त्यामुळे त्यांच्यावर त्या प्रभागातील नागरिकांचा विश्वास आहे. त्यांचे म्हणणे ऐकून न घेताच प्रस्ताव मंजूर करणे हे चूक असल्याची टीकाही पेडणेकर यांनी केली.

दरम्यान, शिवसेनेच्या (ठाकरे) नगरसेवकांचे आरोप यामिनी जाधव यांनी फेटाळून लावले आहेत. त्या म्हणाल्या, मी प्रत्येक प्रस्तावावर सगळ्यांना बोलण्याची संधी दिले होती. मात्र प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर आक्षेप घेतला तर त्यावर बोलण्याची परवानगी देता येत नाही. मी माहिती घेतली असून मला तो प्रस्ताव योग्य वाटला म्हणून मी मंजूर केला, अशी भूमिका यामिनी जाधव यांनी मांडली. रस्ता अवास्तव मोठा असेल आणि काही विकासाच्या गोष्टीच्या आड तो येत असेल, इतर गोष्टीवर परिणाम होत असेल, तर रस्ता लहानही करावा लागतो, असे मत जाधव यांनी व्यक्त केले.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!