मुंबई-सोलापूरदरम्यान धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसमध्ये गेल्या वर्षी साप ठेवल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. या प्रकरणी रेल्वे सुरक्षा दलाने गुन्हा दाखल केला. सीसी टीव्ही चित्रणाच्या आधारे दलाने संशयिताचा माग काढला आणि त्याला मुंब्रा येथून अटक केली.
संशयित हा नाशिक जिल्ह्यातील असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.
मध्य रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा दलाने वंदे भारतमध्ये साप ठेवणाऱ्याला जेरबंद करण्यात यश मिळवले. २७ डिसेंबर २०२५ रोजी वंदे भारत गाडी क्रमांक २२२२५ च्या कोच सी-१६ च्या शौचालयात एक साप आढळला होता. प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. ही बाब लक्षात आल्यावर संबंधित शौचालय तात्काळ बंद करण्यात आले आणि नियंत्रण कक्षाला माहिती देण्यात आली. सोलापूर रेल्वे स्थानकावर सापाला सुरक्षितपणे वाचवण्यात आले. सीसी टीव्ही चित्रणात एका अज्ञात व्यक्तीने शौचालयात साप ठेवल्याचे समोर आले. या प्रकरणी रेल्वे कायद्यातील विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात करीत सुरक्षा दलाने तपास सुरू केला.
सीसी टीव्ही चित्रणाच्या मदतीने आणि एका गुप्त माहितीगाराने दिलेल्या माहितीनुसार, आरपीएफ पथकाने कारवाई केली. मुंब्रा येथून संशयित जगन अर्जुन भाले याला अटक करण्यात आली. चौकशीदरम्यान संशयिताने गुन्ह्याची कबुली दिली. या संशयिताला कल्याण येथील रेल्वे न्यायालयात हजर करण्यात आले, न्यायालयाने त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा सविस्तर तपास सुरू करण्यात आला आहे.
मध्य रेल्वे आरपीएफ पथकाने अल्पावधीत हे प्रकरण सोडवण्यात पुन्हा एकदा कौशल्य दाखवले. अशा प्रकरणांची सोडवणूक करण्यात आणि प्रवाशांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यात रेल्वे संरक्षण दलाच्या प्रयत्नांचे मध्य रेल्वेने कौतुक केले. संशयित जगन भाले हा नाशिक जिल्ह्यातील असून त्याला १२ फेब्रुवारी २०२६ रोजी मुंब्रा येथून अटक करण्यात आल्याचे मध्य रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
दरम्यान, मुंबई-सोलापूर दरम्यान धावणारी वंदे भारत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर, ठाणे, कल्याण कर्जत, पुणे, दौंड, कुर्दवाडी, सोलापूर अशी धावते. वंदे भारत’चा प्रवास प्रवाशांसाठी वेगळी अनुभूती देतो. या विशेष गाडीत वातानुकूलित डबे, स्वयंचलीत तापमान नियंत्रण, दीर्घ प्रवासासाठी आरामदायक बसण्याची व्यवस्था, एलईडी व वातानुकूलन प्रकाश व्यवस्था, आपोआप उघडणारे दरवाजे, मोठी पारदर्शक खिडकी आदी सुविधा आहेत. प्रवाशांच्या सोयीसाठी संवेदक आणि स्वयंचलित अग्निशमन यंत्रणा बसविण्यात आली आहे. या गाडीत साप ठेवण्याच्या घटनेची रेल्वे सुरक्षा दलाने गंभीर दखल घेऊन छडा लावला.











