April 20, 2026 4:27 am

*एसटी चालक-वाहक दारूच्या नशेत तर्रर्र, प्रवाशांच्या जिवाशी खेळ

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

बसस्थानकात शुक्रवारी रात्री ९ वाजता दरम्यान घडलेली घटना म्हणजे एसटी महामंडळाच्या कारभारावर काळा डाग फासणारी ठरली आहे. परतवाडा येथून पुण्याकडे निघालेली एम. एच. १४ एलबी २३४४ क्रमांकाची लांब पल्ल्याची एसटी बस चालक आणि वाहक दोघेही दारूच्या नशेत असल्याचे उघड झाल्याने प्रवाशांमध्ये संतापाची तीव्र लाट उसळली.

प्रवाशांच्या जिवाशी थेट खेळ सुरू असल्याचे लक्षात येताच सजग प्रवाशांनी बस खामगाव बसस्थानकात थांबविली.

लांब पल्ल्याच्या बसमध्ये चढल्यानंतर चालक व वाहक यांची संशयास्पद वागणूक, बोबडे बोलणे आणि दारूचा तीव्र वास येत असल्याने प्रवाशांनी तत्काळ जाब विचारला. मात्र, त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. यामुळे प्रवाशांचा संताप अनावर झाला. आमच्या जीवाची किंमत नाही का? असा सवाल करत प्रवाशांनी वाहतूक नियंत्रकांकडे थेट तक्रार दाखल केली. खामगाव बसस्थानकातील उपस्थित वाहतूक नियंत्रक आणि अधिकाऱ्यांनी बसची पाहणी केली असता या बसमध्ये देशी दारूच्या बाटल्या आढळल्या. तसेच प्रवाशांचा संताप अनावर होत असल्याचे दिसून येताच नशेतील वाहक चालकांना सुरक्षित स्थळी हलविले. लांब पल्ल्याच्या प्रवासात शेकडो प्रवाशांचे प्राण धोक्यात घालणाऱ्या या गंभीर प्रकारामुळे एसटी प्रशासनाच्या निष्काळजीपणावर जोरदार टीका होत आहे. बसस्थानकातील कार्यरत अधिकारी व कर्मचाऱ्यांनी वरिष्ठांशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. मात्र, आश्चर्य म्हणजे तब्बल एक तास प्रवासी ताटकळत राहिले. अखेर एक तासानंतर चालक व वाहक बदलण्यात आल्यानंतरच बस पुढील प्रवासासाठी रवाना झाली. दरम्यान, याबाबत पुढील कारवाई केली जाणार असल्याचे सांगत, संबंधितांनी या प्रकाराबाबत माहिती देण्याचे टाळले.

दोन ठिकाणी बसने दिले हेलकावे –

खामगावकडे येताना मार्गावर या बसने दोन ठिकाणी अचानक हेलकावे दिल्याची माहिती प्रवाशांनी दिली. चालकाच्या असंतुलित वाहनचालनामुळे प्रवासी घाबरून गेले होते. काही प्रवाशांना थेट अपघात होणार असल्याची भीती वाटू लागली होती. सुदैवाने मोठी दुर्घटना टळली; मात्र हा प्रकार अधिक गंभीर असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे. या संपूर्ण घटनेमुळे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) च्या सुरक्षिततेच्या आणि शिस्तीच्या दाव्यांची अक्षरशः पोलखोल झाली आहे. प्रवाशांच्या जिवाशी खेळणाऱ्या मद्यधुंद चालक व वाहकांवर तत्काळ निलंबनासह कठोर कारवाई करण्यात यावी, अशी जोरदार मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.खामगाव बसस्थानकावरील घटनेचे छायाचित्र आहे.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!