अभ्यासाला म्हणून बाहेर पडलेल्या दहावीच्या तीन मुली संध्याकाळ झाली तरी घरी आल्या नाही. पालकांसह नातेवाईकांची धावपळ.. मुली सापडत नसल्याने अखेर नाशिकरोड पोलीस ठाण्यात हरवले असल्याची नोंद होते.
पोलीस यंत्रणा कामाला लागते. दहा तासाच्या अथक शोध मोहिमेनंतर चेहडी परिसरातील एका पेरूच्या बागेत या तीन मुली भेदरलेल्या अवस्थेत.. सुदैवाने त्यांच्या सोबत काही अनुचित प्रकार घडला नाही. मात्र त्यांनी सांगितलेल्या कारणाने पालकांसह पोलीसही चक्रावले.
मालधक्का परिसरात राहणाऱ्या तीन अल्पवयीन मुली सध्या दहावीत शिकत आहे. यातील दोन मुली बहिणी आहे. मैत्रीणीच्या घरी या अभ्यासाठी ये जा करतात. दोघी बहिणी आपल्या मैत्रिणीच्या घरी मंगळवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास अभयासाठी गेल्या होत्या. घराच्या समोरील शेतात तिघीजणी अभ्यास करीत बसलेल्या असतांना मैत्रिणीची आई देखील त्यांच्याजवळच बसून तिचे काम करीत होती. साडे तीन वाजता आई पाण्याचा हंडा भरून घेऊन घरात गेल्याची संधी बघून तिघीही मैत्रिणींनी धूम ठोकली. थोड्या वेळाने घरात गेलेली आई पुन्हा घराबाहेर आल्यावर तिघींनी जागेवर नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. बाहेर पडतांना त्यांनी झेरॉक्स करायला जातो असे सांगत पळ काढला होता. वास्तविक त्या मित्राला भेटायला गेल्या होत्या.
सायंकाळपर्यंत त्या परत न आल्याने त्यांनी त्यांचा मुलीच्या उर्वरित दोघी मैत्रिणींच्या घरी जाऊन शोध घेतला . परंतु त्या तिथेही मिळून न आल्याने त्यांनी आजुबाजूच्या परीसरात, रेल्वे स्टेशन, बस स्थानक आदी ठिकाणी त्यांच्या नातेवाईकांनी शोध घेतला. परंतु त्या मिळून न आल्याने अखेर मुलीच्या कुटुंबीयांनी नाशिकरोड पोलिस ठाणे गाठून तिघी मुलींच्या बेपत्ता झाल्याची झाल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांना दिली.
घटनेचे गांभीर्य ओळखून वरिष्ठ पोलिस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिकरोड पोलिसांनी तिघीही मुलींच्या पालकांना सोबत घेऊन त्यांचा परिसरात शोध घेतला. त्या मिळून न आल्याने तिघींपैकी एकीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून बुधवारी पहाटे चार वाजता अखेर तिघी मुली बेपत्ता झाल्याचा गुन्हा नाशिकरोड पोलिस ठाण्यात दाखल झाला. त्यानंतर पोलिसांनी पुन्हा चेहेडी पंपिंग स्टेशन भागात तिघीही मुलींसाठी शोध मोहिम हाती घेतली. संपूर्ण रात्र पोलिसांची ही मोहिम सुरू होती. अखेरीस या तिन्ही मुली बुधवारी चेहेडी पंपिंग स्टेशन भागातील पेरूच्या बागेत घाबरलेल्या स्थितीत मिळून आल्या. त्यांना ताब्यात घेऊन तिघींनाही पोलिस ठाण्यात त्याच्या पालकांच्या स्वाधीन केले. या तिघी अल्पवयीन मुलींच्या शोधासाठी पोलिसांनी दहा तासाहून अधिक काळ मोहिम राबवली.
दरम्यान, त्या बाहेर का होत्या अशी विचारणा केली असता घरी येण्यासाठी उशीर झाल्याने घरचे रागावतील या भीतीने आपण घरी न येता पेरूच्या बागेतच थांबून राहिल्याची माहिती तिघी अल्पवयीन मुलींनी पोलिसांना दिली. किर्र अंधारात कोणी तिथे फारसे फिरकत नसतांना तिघी अल्पवयीन मुलींनी रात्रभर ठिय्या दिल्याची बाब समजल्यावर सर्वांनी डोक्याला हात लावून घेतला.











