April 22, 2026 12:32 am

*’ड्रेनेजमध्ये झाडांची मुळे’ आणि पावणे सात कोटींचा गंडा

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

ड्रेनेज लाईन दुरुस्तीच्या नावाखाली सुरू झालेला एक साधा व्यवहार तब्बल ६ कोटी ७० लाख ३७ हजार ५०० रुपयांच्या महासायबर फसवणुकीत रुपांतरीत झाला. कधी कंत्राटदार, कधी पोलीस अधिकारी, तर कधी थेट ‘न्यायाधीश’ असल्याचे सांगत सिरम इन्स्टिट्यूटमधून सेवानिवृत्त झालेल्या वरिष्ठ अधिकाऱ्याला वर्षभर मानसिक दबावाखाली ठेवत कोट्यवधी रुपये उकळल्याचा प्रकार समोर आला आहे. पोलिसांचीही डोके चक्रावून सोडणारा हा प्रकार घडला आहे पुण्याच्या नारायण पेठेत. ड्रेनेजमध्ये झाडांची मुळे आली असून ती काढावी लागतील या कारणास्तव फोनवरुन संपर्क साधत सायबर चोरटयांनी या ज्येष्ठाला ठगायला सुरुवात केली. या प्रकरणाचा आर्थिक गुन्हे शाखेने गांभीर्याने तपास सुरु केला आहे.

संदिप चव्हाण, आदित्य चव्हाण, जितेन सोळंकी, शर्मा आणि राउत, बँक मॅनेजर, जज म्हणुन सांगणारा इसम, महाजन अशा नावाच्या व्यक्तींवर विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी ६१ वर्षीय व्यक्तीने फिर्याद दिली आहे. फिर्यादी सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियामधून अतिरिक्त संचालक पदावरून सेवानिवृत्त झाले आहेत. याप्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम ३१६, ३१८, ३१९, ३०८, ६१ आणि ३(५) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादीच्या आईच्या नावावर नवी पेठेत घर आहे. या घरामध्ये सध्या भाडेकरू राहतात. २८ एप्रिल २०२४ रोजी दुपारी त्यांना भाडेकरूने फोन करून एक व्यक्ती घराच्या घराच्या ड्रेनेजबाबत तपासणी करण्यास आलेला असल्याची माहिती दिली. तसेच, त्याच्याशी बोलण्यास सांगितले. फिर्यादीने तपासणीसाठी आलेल्या व्यक्तीशी फोनवरून बोलणी केली.

त्याने त्याचे नाव संदिप चव्हाण असल्याचे सांगितले. सोसायटीची तक्रार असून सोसायटीने सांगितल्यामुळे ड्रेनेजची तपासणी करण्यासाठी आलेलो असल्याची बतावणी केली. ड्रेनेजमध्ये झाडांची मुळे गेलेली असल्यामुळे तुमच्या घरापासुन स्वतंत्र ड्रेनेजची लाईन मेन ड्रेनेज लाईनपर्यत टाकावी लागेल असे सांगितले. त्याने स्वतः महापालिकेचा अधिकारी असल्याची बतावणी केली. फिर्यादीने हे काम करुन देण्याची तयारी दर्शविली. हा कामासाठी ६५ हजार रुपये खर्च येईल तसेच साहित्य व मशिनरीचा खर्च वेगळा होईल असे सांगितले. त्याला देखील फिर्यादीने होकार दर्शविला. त्यानुसार, त्यांनी ६५ हजार रुपये त्याला ऑनलाईन पाठवून दिले.

आरोपी चव्हाण याने वेळोवेळी मटेरियल घेण्यासाठी, मशीन डीपॉझीट, एमएसईबी केबल शिफ्टींग, वेगवेगळ्या मशनरीसाठी, पाणी पुरवठा, कामाची लांबी वाढविली. तसेच, विविध विभागाचे चलन भरण्याचे कारण देत मटेरियलसाठी १५ लाख ५३ हजार ७०० रुपये, मशीन डीपॉझीटसाठी ९ लाख ९९ हजार, तसेच वेळोवेळी पुणे महानगरपालिकेचे चलन भरण्यासाठी आणखी ८ लाख ७६ हजार रुपये उकळले. आरोपीने त्यामधील मशीन डिपॉझीट आणि चलनासाठी भरलेले पैसे हे थोडे कापून उरलेले पूर्ण पैसे परत मिळतील असे सांगितले होते.

त्यानंतर फिर्यादीने प्रत्यक्ष जागेवर साहित्य आले आहे का, मशनरी आलेली आहे का? काम चालु झाले आहे का? याबाबत माहिती घेतली. त्यावेळी या ठिकाणी कोणतेही काम सुरु नसल्याचे तसेच मशनरी किंवा साहित्य आले नसल्याचे समजले. त्यांनी चव्हाण याला जुलै २०२४ मध्ये फोन केला. त्यावेळी त्याने पुणे महानगरपालिकेने सोसायटीची पूर्ण ड्रेनेज लाईन ही रस्त्याच्या दुस-या बाजूला हलवली असून फक्त शेवटचे पाईप जोडायचे बाकी आहेत, ते झाले की तुमचे काम सुरु होईल असे सांगितले. त्यानंतर काही दिवसांनी पाहणी केली असता कोणतेही काम सुरु नसल्याचे समोर आले.

त्यांनी पुन्हा आरोपीला फोन केला असता त्याने आधी मशीन डीपॉझीट आणि चलनाचे पैसे परत घेऊन देतो असे आश्वासन दिले. अडागळे नावाच्या व्यक्तीने फिर्यादीला फोन करून तो बँक ऑफ महाराष्ट्र पीएमसी ब्राँचमधून बोलतोय असे सांगत ६५ हजार परत पाठवीत असल्याची बतावणी केली. मात्र, फिर्यादीला हे पैसे परत मिळाले नाहीत. त्यानंतर पुन्हा १० जुलै रोजी फिर्यादीला फोन आला. त्याने पोलीस उपनिरीक्षक बोलत असल्याचे सांगितले. ‘तुमचे काम संदिपला दिले होते. त्याने गोंधळ घातला आहे. त्याला पोलीस स्टेशनला आणले असल्याची बतावणी केली. त्याने त्याचा वकील, त्याचा भाऊ आदित्य चव्हाणशी बोलण्यास सांगितले. आदित्य चव्हाण नाव सांगणाऱ्या व्यक्तीने इथुन पुढे संदिप चव्हाण तुमच्याशी बोलणार नाही मीच तुमच्याशी बोलेल आणि तुमचे डिपॉझीटचे पैसे परत मिळवुन देतो, असे सांगितले. त्यानंतर आदित्य, अनिल चव्हाण (संदिप आणि आदित्यचे वडील), सोलंकी, शर्मा, कदम, राउत असे वेगवेगळया नावांनी सर्वजण फिर्यादीशी बोलत होते. त्यांना डिपॉझीट परत मिळण्यासाठी वेगवेगळी कारणे सांगत भिती दाखवून पैसे पाठवायला सांगायचे.

तसेच न्यायाधीश बोलतोय असा एका आरोपीने फोन करून आदित्य व इतरांना फिर्यादीने दिलेले पैसे भरलेले नाहीत. त्यामुळे ते पुन्हा मला भरावे लागणार असल्याचे सांगितले. घाबरलेल्या फिर्यादीने पुन्हा पैसे पाठविले. अशा प्रकारे त्यांच्याकडून ट्रान्सफर चार्जेस, सर्विस चार्ज, बँकेच्या खात्यामध्ये बॅलन्स मेन्टेन करणे, तसेच संदिप चव्हाणच्या मुलाचे ऑपरेशन, संदिप चव्हाणचा मुलगा वारला, राउतचा मुलगा वारला, जजची बायको वारली, आदित्यच्या मुलाचे ऑपरेशन असे कारणे सांगत ब्लॅकमेल करुन पैसे देण्यास भाग पाडले. त्यांच्याकडून जून २०२५ पर्यंत ६ कोटी १६ लाख १३ हजार ३००६ कोटी ७० लाख ३७ हजार ५०० रुपये उकळण्यात आले. या प्रकरणाचा पुढील तपास आर्थिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक दादासाहेब पाटील करीत आहेत.

कोट्यवधींची रक्कम ‘चार खात्यां’त

• बँक ऑफ महाराष्ट्र – ₹९४,५१,५००

• सारस्वत बँक, औंध – ₹४,९१,३२,५००

• सुर्योदय स्मॉल फायनान्स – ₹७३,८७,५००

• विश्वेश्वर सहकारी बँक – ₹४,००,०००

एकूण रक्कम – ₹६,७०,३७,५००

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!