न्यायालयात एखाद्या प्रकरणाची सुनावणी सुरू राहते. न्यायाधीशांसमोर वकील युक्तिवाद करतात आणि अगदी त्याच वेळी काही गुंड प्रवृत्तीचे लोक न्यायालयात प्रवेश करतात आणि आरोपीला वाचविण्यासाठी मारहाण करतात.
अनेक हिंदी चित्रपटात दाखविण्यात आलेली ही कथा शनिवारी सत्यात उतरली. दिल्लीमधील तीस हजारी न्यायालयात चित्रपटसदृश्य घटना सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्यासमोर सांगण्यात आली. सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी या घटनेवर पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
नेमके काय झाले?
दिल्लीतील तीस हजारी न्यायालय परिसरात मागील शनिवारी घडलेल्या एका अत्यंत गंभीर आणि धक्कादायक घटनेचा उल्लेख सोमवारी एका वकिलाने सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्यासमोर केला. तक्रार करणाऱ्या संबंधित वकिलाने सांगितले की, तो अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश हरजीतसिंग पाल यांच्या न्यायालयात एका आरोपीच्या वतीने बाजू मांडत असताना ही घटना घडली.
सुनावणी सुरू असतानाच तक्रारदाराचा वकील काही असामाजिक घटकांसह अचानक न्यायालयात घुसला. या सर्वांनी न्यायाधीशांच्या समोरच संबंधित वकिलावर तसेच आरोपीवर हल्ला केला. एवढ्यावरच न थांबता, न्यायालयाचा दरवाजा आतून बंद करून दोघांनाही बेदम मारहाण करण्यात आली. ही संपूर्ण घटना न्यायालयात, न्यायाधीशांच्या प्रत्यक्ष उपस्थितीत घडल्याने ती अत्यंत गंभीर स्वरूपाची असल्याचे वकिलाने नमूद केले. या मौखिक उल्लेखावर प्रतिक्रिया देताना सरन्यायाधीश न्या. सूर्यकांत यांनी नाराजी व्यक्त केली. त्यांनी वकिलाला स्पष्ट शब्दांत विचारले की, अशा गंभीर घटनेबाबत थेट तोंडी उल्लेख करण्याऐवजी दिल्ली उच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांकडे लेखी तक्रार का करण्यात आली नाही. “दिल्लीतील न्यायव्यवस्थेचे प्रमुख असलेल्या सरन्यायाधीशांच्या निदर्शनास ही बाब प्रथम आणणे अपेक्षित होते. तुम्ही थेट माझ्यासमोर उल्लेख करता आहात, म्हणजे माध्यमांचे लक्ष वेधण्याचा उद्देश आहे का?” असा थेट सवालही त्यांनी केला.
यावर वकिलाने उत्तर देताना सांगितले की, या प्रकरणात पोलीस कोणतीही ठोस कारवाई करण्यास घाबरत आहेत. तसेच आपण सुप्रीम कोर्ट बार असोसिएशनचा सदस्य असल्याने न्याय मिळावा, या अपेक्षेने सरन्यायाधीशांसमोर हा मुद्दा मांडत असल्याचेही त्याने स्पष्ट केले. त्यावर सरन्यायाधीश न्या. सूर्यकांत यांनी वकिलाला स्पष्टनिर्देश दिले. त्यांनी सांगितले की, संबंधित घटनेची सविस्तर लेखी तक्रार दिल्ली उच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांकडे दाखल करावी आणि त्याची प्रत स्वतःकडेही पाठवावी. “ही बाब न्यायालयीन प्रक्रियेऐवजी प्रशासकीय पातळीवर हाताळली जाईल. प्रथम तक्रार करा, दिल्ली उच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश त्याची दखल घेतील. न्यायालयात अशा प्रकारची गुंडगिरी होणे अजिबात स्वीकारार्ह नाही,” असे स्पष्ट मत सरन्यायाधीशांनी व्यक्त केले.











