April 17, 2026 4:29 pm

*शरीर कमावण्याच्या नादात जीवाशी खेळ!

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

 

 

शहरात प्रतिबंधित इंजेक्शनमधून केवळ नशेखोरीच नव्हे, तर व्यायाम, बॉडीबिल्डिंग आणि ॲथलेटिक्ससह विविध क्रीडा प्रकारांत शारीरिक क्षमता वाढविण्यासाठी सर्रास गैरवापर होत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.

काही महिन्यांत पोलिसांनी केलेल्या तीन मोठ्या कारवाया आणि मागील महिनाभरातील दोन धडक कारवायांमुळे हे भयावह चित्र उघड झाले आहे. पश्चिम महाराष्ट्रात इचलकरंजी शहर प्रतिबंधित इंजेक्शन नशेखोरीत टोकाला पोहोचल्याचे स्पष्ट झाले आहे.

मेफेन्टर्मिन सल्फेटसारखी इंजेक्शन्स वैद्यकीय उपचारांसाठी मर्यादित प्रमाणात वापरण्यात येतात. मात्र, शहरात या इंजेक्शनचा वापर नशेसाठी तसेच ताकद, सहनशक्ती आणि स्टॅमिना वाढवण्यासाठी होत असल्याचे समोर आले आहे.

विशेषतः व्यायामशाळांत तसेच धावणे, बॉडीबिल्डिंग यांसारख्या क्रीडा प्रकारांत सहभागी असलेले तरुण या इंजेक्शनच्या विळख्यात अडकत असल्याची धोकादायक स्थिती निर्माण झाली आहे.

सहा महिन्यांत इचलकरंजी शहरात प्रतिबंधित इंजेक्शनविरोधात सलग तीन मोठ्या कारवाया झाल्या आहेत. केवळ मागील महिनाभरातच दोन धडक कारवाया केल्या. या कारवायांत तब्बल २१९ नशिल्या इंजेक्शनच्या बाटल्या, दुचाकी, मोबाईल आणि इतर साहित्य जप्त केले आहे. यामुळे शहरात नशेचे जाळे किती खोलवर पसरले आहे, हे स्पष्ट झाले आहे.

तरुणाई धोक्यात; खेळाडू संकटात

नशेखोरीमुळे तरुणाई गुन्हेगारीकडे वळत असतानाच क्रीडा क्षेत्रात कामगिरी वाढविण्यासाठी घेतले जाणारे प्रतिबंधित इंजेक्शन दीर्घकालीन आरोग्याला गंभीर धोका निर्माण करत आहेत. हृदयविकार, मूत्रपिंड निकामी होणे, मानसिक असंतुलन, व्यसनाधीनता आणि अचानक मृत्यू यासारख्या गंभीर परिणामांचा धोका असल्याचे वैद्यकीयतज्ज्ञांनी सांगितले.

नशेतून तस्करीकडे…

प्रतिबंधित इंजेक्शनमधून तरुण आधी नशेच्या आहारी जात असून, पुढे याच व्यसनातून ते थेट इंजेक्शन तस्करीकडे वळत असल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. या माध्यमातून अवैध व्यवसायाची छुपी साखळी तयार होऊन आर्थिक काळाबाजार उभा राहत आहे. आतापर्यंत झालेल्या तिन्ही मोठ्या कारवायांत एकाच टोळीचा सहभाग असल्याचे समोर आले आहे.

तपासाची व्याप्ती वाढताच नवनवी नावे निष्पन्न होत असल्याने नशेचे जाळे अधिक भयावह असल्याचे उघड झाले आहे.

कनेक्शन दिल्लीचे; पण तपास शून्यच

पहिल्या कारवाईत सखोल चौकशीत नशिल्या इंजेक्शन पुरवठ्याचे कनेक्शन थेट दिल्लीपर्यंत असल्याचे उघड झाले होते. मात्र, त्या दिशेने ठोस तपास न झाल्याने एकही संशयित हाती लागला नाही. उर्वरित दोन्ही कारवायांतही गुन्हेगार एकाच टोळीतील असल्याने दिल्ली कनेक्शन पुन्हा समोर आले तरीही सखोल तपासाअभावी ही साखळी अजूनही तुटलेली नाही. दिल्ली कनेक्शनवर ठोस कारवाई झाली नाही, तर इचलकरंजीतील तपास कायमच शून्य ठरण्याची भीती व्यक्त होत आहे.

ऑनलाईन ‘डील’, शहराबाहेर ‘डिलिव्हरी’

ऑनलाईन ॲपच्या माध्यमातून बनावट नाव-पत्त्यांवर अकाऊंट तयार करून, स्वतःचा मोबाईल नंबर देत नशिल्या इंजेक्शनची खरेदी-विक्री केली जात असल्याचे तपासात समोर आले आहे. पोलिसांची नजर चुकविण्यासाठी शहराच्या बाहेर निर्जन ठिकाणी व्यवहार पूर्ण केले जात आहेत. यामुळे नशा तस्करीचे सायबर जाळे अधिकच धोकादायक बनले आहे.

इंजेक्शन नशा कारवाई अशा

पोलिस ठाणे जप्त बॉटल

गावभाग ५२

शिवाजीनगर ६७

गावभाग १००

एकूण २१९

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!