सोलापुरातील 68 जिल्हा परिषद गट आणि 136 पंचायत समितीच्या निवडणूका शनिवारी 7 फेब्रुवारी रोजी संपन्न झाल्या. दक्षिण सोलापूर तालुक्यातील मुळेगाव तांडा येथील मतदान केंद्रावर एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे.
मतदान केंद्रावरील ईव्हीएम मशीनखाली चक्क टाचण्या टोचलेले लिंबू आणि मिरची ठेवून जादूटोणा केल्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर वायरल झाले आहेत. याबाबत अपक्ष उमेदवार संदीप राठोड यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. ईव्हीएम मशीन खाली चक्क लिंबूला टाचण्या टोचून बिबा ठेवल्याने मतदारांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे.
धक्कादायक प्रकार समोर आला
सोलापूर शहराला चिटकूनच दक्षिण सोलापूर तालुका आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमुळे दक्षिण सोलापूर मध्ये राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.या तालुक्यातील मुळेगाव तांडा येथील मतदान केंद्रावर मतदानाची प्रक्रिया सुरू होती. एक महिला मतदार मतदान करण्यासाठी केंद्रात गेली. मतदान करून बाहेर येत असतानाच त्या महिलेला अचानक चक्कर आली आणि ती जागीच कोसळली. शुद्धीवर आल्यानंतर त्या महिलेने ईव्हीएम मशीनच्या खाली लिंबू-मिरची आणि जादूटोण्याचे साहित्य पाहिल्याचे सांगितले.
अपक्ष उमेदवार संदीप राठोड यांनी हा प्रकार समोर आणला
शुद्धीवर आलेल्या महिलेच एकूण खातरजमा करण्यासाठी पंचायत समिती निवडणुकीत अपक्ष लढणारे उमेदवार संदीप राठोड या तातडीने मतदान केंद्रात जाऊन पाहणी केली. त्यांना ईव्हीएम मशीनच्या खालील बाजूस टाचण्या टोचलेले लिंबू आणि मिरची आढळून आली. हे पाहून उमेदवार आणि तेथील प्रतिनिधींना मोठा धक्का बसला.
निवडणूक आयोग काही कारवाई करणार का?
मुळेगाव तांडा येथील मतदान केंद्रावर जादूटोण्याच्या सारखा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या कृत्यात जे अधिकारी आणि उमेदवार सामील आहेत त्यांची सखोल चौकशी व्हावी आणि त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी संदीप राठोड यांनी केली आहे.
“लोकशाहीच्या पवित्र मंदिरात अशा प्रकारे जादूटोणा करून मतदारांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केला जात आहे, हा प्रकार निंदनीय आहे,” असेही राठोड यांनी यावेळी म्हटलं आहे.











