केंजळ ता.भोर येथे धक्कादायक घटना घडली आहे. भोर येथे शिवारात ऊसतोडीचे काम करणाऱ्या ऊसतोड कामगाराच्या कुटुंबातील पाच वर्षीय बालक ऊस तोड चाललेल्या शेताजवळच गंभीर जखमी अवस्थेत आढळल्याचे समोर आले आहे.
यानंतर मृत मुलाच्या पालकांनी तातडीने भोर येथील रुग्णालयात नेले, परंतु उपचारापुर्वीच त्याचा मृत्यु झाल्याचे निदर्शनास आले. या घटनेबाबत वन्य प्राण्याकडून हल्ला झाला की अन्य याबाबत वनविभाग नसरापूर व राजगड पोलिस तपास करत आहेत.
कृष्णा किरण सोनवणे (वय पाच वर्ष) रा.सध्या केंजळ ता.भोर मुळगाव चाळीसगाव या बालकाचा या घटनेत मृत्यु झाला. आज शनिवार (ता.7) रोजी सकाळी या बालकासहीत त्याचे कुटुंबीय केंजळ येथील एका ऊसाच्या फडात ऊस तोडण्यासाठी गेले होते. यावेळी सकाळी ऩऊ वाजण्याच्या सुमारास कृष्णाला शौच्यास लागल्याने त्याची आई सरला हिने त्यास शेताच्या एका बाजूला जायला सांगितले.
आईच्या सांगण्याप्रमाणे कृष्णा त्या ठिकाणी गेला. त्यानंतर बराच वेळ झाला तरी कृष्णा परत न आल्याने त्याच्या आई-वडीलांनी शोधाशोध सुरु केली. यादरम्यान सुमारे एक तासाने शेताच्या एका बाजुला कृष्णा जखमी अवस्थेत पडल्याचे निदर्शनास आले. यानंतर पीडित मुलाला तातडीने भोर ग्रामिण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. परंतु उचारापुर्वीच त्याचा मृत्यु झाल्याचे समोर आले.
या घटनेनंतर कृष्णावर बिबट्याने हल्ला केला असल्याची शक्यता नागरिकांनी व्यक्त केली होती. त्यानुसार वनविगाच्या भोर उपविभागीय अधिकारी शितर राठोड,नसरापूर वनपरिक्षेत्र अधिकारी वसंत चव्हाण, वनपाल संदीप जोशी व वनरक्षक गुजर व कंक यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी वसंत चव्हाण यांनी माहिती देताना सांगितले की, सदर घटनेच्या ठिकाणची आम्ही पाहणी केली. तसेच तेथे उपस्थित असलेल्या ऊसतोड कामगारांकडून माहितीनुसार कुत्र्याने सदर बालकावर हल्ला केल्याचे माहिती मिळत आहे. तसेच घटना घडलेल्या भागात तपासणी केली असता कुत्र्याच्या पायाचे ठसे निदर्शनास आले असल्याचे त्यांनी सांगितले.
राजगड पोलिसांनी याबाबत दखल घेतली असून पोलिस कर्मचारी भोर ग्रामिण रुग्णालयात जाऊन बालकाच्या पालकांचा जबाब घेत आहेत. तसेच या बाबत नोंद घेऊन पुढील तपास करण्यात येणार असल्याची माहिती पोलिस कर्मचारी सागर कोंढाळकर यांनी दिली आहे. या घटनेने परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.











