April 23, 2026 3:28 pm

*नेवाशातील ‘सौंदाळा’चा आणखी एक ऐतिहासिक निर्णय

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

महाराष्ट्रात अनेक ग्रामपंचायती त्यांच्या ग्रामसभेत घेतलेल्या निर्णयामुळे चर्चेत राहील्या आहेत. जे निर्णय सरकारला ही घेता आले नाही असे निर्णय राज्यातल्या ग्रामपंचायतींनी घेतले आहेत. असा एक निर्णय आता अहिल्यानगर जिल्ह्यातील सौंदाळा या ग्रामपंचायतीने घेतला आहे. हे गाव नेसासे तालुक्यात येते. जगाला पसायदान देणाऱ्या संत ज्ञानेश्वर माउलींच्या भूमीतील नेवासे तालुक्यातील सौंदाळा येथील ग्रामस्थांनी आपले गाव जातमुक्त झाल्याची घोषणा केली आहे. यासंबंधीचा ठराव ग्रामसभेत मंजूर करण्यात आला असून, असा निर्णय घेणारे सौंदाळा हे राज्यातील पहिले गाव ठरले आहे. विविध समाजोपयोगी उपक्रम राबवणाऱ्या नेवासा तालुक्यातील सौंदाळा ग्रामपंचायतीनं आता पुन्हा एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे.

 

सध्या जात-धर्मावरून सतत वादंग होत आहेत. त्याचा परिणाम समाजावर, गावांवर होत आहे. त्यामुळे आपल्या गावांपासून जातमुक्तीची सुरुवात करण्यासाठी सौंदाळा ग्रामस्थांनी पुढाकार घेतला. गावात स्वातंत्र्य, समता, बंधुता अंगीकारण्यासाठी जातमुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. गावातील वेगवेगळ्या पंधरा लोकांनी रक्तदान करून एकोपा दाखवला. त्यानंतर त्यानंतर सरपंच शरद आरगडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्याग्रामसभेत गाव ‘जातमुक्त’ झाल्याची घोषणा केली. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ नुसार ग्रामसभेला गावाच्या सामाजिक, शैक्षणिक व नैतिक विकासासंबंधी; तसेच सार्वजनिक हिताच्या विषयांवर ठराव करण्याचा अधिकार आहे. त्या अधिकाराचा वापर करून हा निर्णय घेण्यात आला.

या ठरावाने काय होणार ?

गावांत जात, पंथ, धर्म, वंश याबाबत भेदभाव केला जाणार नाही.

सर्व नागरिक समान आहेत. ‘माझी जात मानव’ ही भावना स्वीकारली.

आंतरजातीय विवाह होतील, त्यासाठी सर्व मदत केली जाईल.

सार्वजनिक ठिकाणे, शासकीय योजना, ग्रामपंचायत सेवा, सामाजिक-धार्मिक कार्यक्रम, विवाह, सण-उत्सवात जातिभेद बंद.

कोणतीही जातनिहाय प्रथा, भेदभाव, बहिष्कार, अस्पृश्यता, सामाजिक अन्याय आढळल्यास ग्रामसभा/ग्रामपंचायत त्यावर तत्काळ कारवाई होईल.

सौंदळा गाव ‘जातमुक्त गाव’ म्हणून घोषित करण्यात येत आहे. तसे फलक लावण्यात येतील.

सोशल मीडियावर जाती भेदभावबाबत संदेश करणार नाही. कुणाला करूही देणार नाही.

शासनाच्या समता व सामाजिक न्याय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येईल.

सौंदाळा ग्रामपंचायतीचे यापूर्वीचे ऐतिहासिक निर्णय…

आहिल्यानगर म्हणजेच अहमदनगर जिल्ह्यात हे गाव आहे. 2011 च्या जनगणने नुसार या गावाची लोकसंख्या ही 1800 आहे. हे गाव तंटामुक्त गाव आहे. तसा पुरस्कारही या गावाला मिळाला आहे. यागावाने नेहमीच समाजाचा आणि गावाचा विकास पाहिला आहे. त्या दृष्टीने चांगले निर्णयही केले आहेत. गावाची ही ग्रामपंचायतीला चांगली साथ लाभली आहे. त्यामुळे आतापर्यंत चांगले निर्णय झाले आहेत. त्याचे कौतूक ही संपूर्ण राज्यात झाले आहे.

शिव्या द्याल तर 500 रूपये दंड

सौंदाळा ग्रामपंचायतीच्या ठरावानुसार गावात जर का कोणी शिवी दिली तर त्याला 500 रूपयांचा दंड केला जाईल. अनेक वेळा भांडणं झाल्यानंतर कारण नसताना आई बहिणींवरून शिव्या दिल्या जातात. त्यात आई बहीणींची चुकी नसताना असे अपशब्द वापरले जातात. हे टाळले जावे यासाठी ग्रामसभेना हा निर्णय घेतला आहे.

शालेय विद्यार्थ्यांकडे मोबाईल देण्यास बंदी

सौंदाळा ग्रामपंचायतीनं आजपर्यंत समाजोपयोगी विविध उपक्रम राबवले आहेत. गावातील महिला आणि पुरुषांनी तसंच बाहेरून आलेल्या लोकांनी शिवीगाळ केल्यास 500 रुपयांचा दंड सक्तीनं आकारण्यात येतो. त्याचबरोबर राज्यातील पहिली ग्रामपंचायत म्हणून संध्याकाळी 7 ते रात्री 9 या वेळेत घरातील शालेय विद्यार्थ्यांकडं मोबाईल देण्यास बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मोबाईल दिसल्यास त्या कुटुंबीयांना 500 रुपयांचा दंड असा ठराव करण्यात आला असून अनेकांकडून दंडही वसूल करण्यात आला आहे. तसंच बालकामगारमुक्त गाव करण्यासाठी बालकामगार दाखवा, एक हजार रुपये मिळवा असं आवाहनही करण्यात आलं होतं.

हुंडा घेणारा कळवा, 5 हजार रुपये मिळवा

मागील वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळं शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं. कर्जाचा बोजा आणि अपुरी मदत यामुळं शेतकऱ्यांवर मोठं संकट ओढवलं होतं. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांवरील शैक्षणिक खर्चाचा भार हलका करण्यासाठी सौंदाळा ग्रामपंचायतीनं पुढाकार घेतला होता. सौंदाळा गावातील प्रत्येक मुलीचं पालकत्व ग्रामपंचायतीने स्वीकारलं होतं. त्याचबरोबर गावात हुंडा घेणाऱ्यांविरोधात कठोर भूमिका घेत हुंडा घेणारा कळवा, 5 हजार रुपये मिळवा असा ठराव ग्रामसभेत एकमताने मंजूर करण्यात आला. या ठरावामुळं केवळ हुंडा प्रथा थांबवण्याबरोबरच कौटुंबिक हिंसाचार रोखण्यासाठीही मदत होणार असल्याचं ग्रामपंचायतचे सरपंच शरद आरगडे यांनी सांगितलं.

सकाळी ठीक 10 वाजता भोंग्यावर वाजणार राष्ट्रगीत

गावातील शाळांमध्येही राष्ट्रगीताच्यावेळी उभे राहून सन्मान करण्याचं आवाहन शिक्षकांनी विद्यार्थ्यांना केलं आहे. या निर्णयाचं गावातील नागरिकांनी स्वागत केलं असून हा निर्णय देशाच्या भवितव्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल असं मत व्यक्त केलं आहे. या उपक्रमामुळं देशातील जातीयवाद संपून देश अखंड राहील आणि सर्व नागरिकांमध्ये एकता आणि समता निर्माण होईल, असं ग्रामपंचायतीच्या सरपंच, उपसरपंच व सदस्यांनी सांगितलं.

ग्रामपंचायतीच्यावतीनं गावात लावण्यात आलेल्या भोंग्यावर सकाळी ठीक 10 वाजता राष्ट्रगीत लागल्यानंतर शेतात काम करणारे तसंच रस्त्याने जाणारे नागरिकांच्या कानावर राष्ट्रगीत ऐकू येताच जिथे असतील तिथेच थांबून राष्ट्रगीताचा सन्मान करतात. ग्रामपंचायतीच्यावतीनं आजपासून राष्ट्र प्रथम या संकल्पनेतून हा उपक्रम सुरू करण्यात आल्यानं याचं सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे. हा उपक्रम राज्यातील सर्वच ग्रामपंचायतींनी राबवावा असं आवाहनही सरपंच शरद आरगडे यांनी केलं आहे.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!