पिंपरी-चिंचवड शहरातील झपाट्याने वाढणाऱ्या लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर पाणीपुरवठ्याचे दीर्घकालीन व शाश्वत नियोजन करावे. उन्हाळ्याच्या काळात नागरिकांना पाण्याची कोणतीही टंचाई भासू देऊ नका. पाणीपुरवठा यंत्रणा अधिक सक्षम, कार्यक्षम आणि सुरळीत ठेवा, असे स्पष्ट आदेश महापौर रवी लांडगे यांनी महापालिका अधिकाऱ्यांना दिले आहेत.
महापौर लांडगे यांनी शनिवारी निगडी येथील सेक्टर २३ आणि चिखली येथील जलशुद्धीकरण केंद्रांना भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे, मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे, सह शहर अभियंता अजय सुर्यवंशी, कार्यकारी अभियंता महेश बरीदे तसेच जनसंपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक उपस्थित होते.
शहराची वाढती गरज, भविष्यातील तयारी
पाहणीदरम्यान महापौरांनी शहराला सध्या लागणारी एकूण पाण्याची गरज, महापालिकेकडून करण्यात येणारा पाणीपुरवठा आणि भविष्यातील वाढती मागणी लक्षात घेऊन राबविण्यात येणाऱ्या तसेच प्रस्तावित उपाययोजनांची सविस्तर माहिती घेतली. पाणी उचल, शुद्धीकरण, साठवण आणि वितरण या संपूर्ण साखळीचा आढावा घेत त्यांनी कामांमध्ये गती आणण्याचे निर्देश दिले.
चिखलीसाठी ९० एमएलडी पाणी, नवीन प्रकल्पाला गती देण्याचे आदेश
चिखली परिसरासाठी सध्या इंद्रायणी नदीवरील निघोजे बंधाऱ्यातून दररोज ९० दशलक्ष लीटर (एमएलडी) पाणी उचलण्यात येते. हे पाणी चिखली येथील जलशुद्धीकरण प्रकल्पात प्रक्रिया करून परिसरातील नागरिकांना वितरित केले जाते.
याशिवाय भविष्यातील वाढती पाण्याची गरज लक्षात घेऊन भामा आसखेड धरणातून येणाऱ्या पाण्यासाठी २०० एमएलडी क्षमतेचा स्वतंत्र जलशुद्धीकरण प्रकल्प उभारण्याचे काम सुरू असून, या प्रकल्पाला गती देण्याच्या सूचना महापौरांनी दिल्या.
निगडी जलशुद्धीकरण केंद्राची क्षमता ५५० एमएलडी
निगडीतील सेक्टर २३ येथील जलशुद्धीकरण केंद्र सुरुवातीला ११४ एमएलडी क्षमतेने कार्यान्वित झाले होते. मात्र शहराचा विस्तार, नवीन निवासी व औद्योगिक क्षेत्रांची वाढ आणि पाण्याच्या मागणीत झालेली लक्षणीय वाढ लक्षात घेता या केंद्राचा टप्प्याटप्प्याने विस्तार करण्यात आला आहे. सध्या हे केंद्र ५५० एमएलडी क्षमतेने कार्यरत असून पवना नदीतील पाण्यावर प्रक्रिया करून पंपिंग व्यवस्थेद्वारे शहरातील सुमारे ७५ टक्के भागाला पाणीपुरवठा केला जात आहे.
पाण्याच्या गुणवत्तेवर विशेष लक्ष
पाणी शुद्धीकरणाची प्रक्रिया, पाण्याच्या गुणवत्तेची नियमित तपासणी, वितरण व्यवस्था तसेच शहरातील विविध भागांतील पाण्याच्या टाक्यांची क्षमता व सद्यस्थिती याची माहिती मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे आणि सह शहर अभियंता अजय सुर्यवंशी यांनी महापौरांना दिली. भामा आसखेड जलवाहिनी प्रकल्प, पवना बंद जलवाहिनी प्रकल्प आदी कामांचाही आढावा यावेळी घेण्यात आला.
नागरिकांचा हक्क जपण्याचा निर्धार
“स्वच्छ व नियमित पाणीपुरवठा हा प्रत्येक नागरिकाचा हक्क आहे. तो हक्क मिळवून देणे ही माझी जबाबदारी आहे. शहरातील नागरिकांना भविष्यातही नियमित, पुरेशा दाबाने आणि दर्जेदार पाणीपुरवठा होण्यासाठी पायाभूत सुविधा अधिक मजबूत केल्या जातील,” असा ठाम विश्वास महापौर रवी लांडगे यांनी व्यक्त केला.
उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने पाणीपुरवठ्याबाबत सज्ज राहावे आणि नागरिकांना कोणत्याही अडचणीला सामोरे जावे लागू नये, यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.











