अंबरनाथ शहरातील सुमारे २१० एकर क्षेत्रावर विस्तारलेल्या अंबरनाथ सामुदायिक सहकारी शेतकी संस्थेची जागा शासनाने पुनर्ग्रहित करण्याचे आदेश, तसेच बदलापुरातील सांडपाणी व्यवस्था व अनधिकृत बांधकामांबाबत उच्च न्यायालयात सुरू असलेल्या खटल्याच्या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी बुधवारी अंबरनाथ व बदलापूर शहरात प्रत्यक्ष पाहणी केली.
उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार करण्यात आलेल्या या पाहणीत अंबरनाथ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, प्रस्तावित क्रीडा संकूल, शेतकी संस्थेची जागा तसेच बदलापुरातील सांडपाणी प्रक्रिया केंद्र यांचा समावेश होता. या पाहणीचा सविस्तर अहवाल पुढे न्यायालयात सादर केला जाणार आहे.
शेतकी संस्थेच्या २१० एकर जागेची पाहणी
अंबरनाथ शहराच्या पूर्व भागात प्रस्तावित असलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या उभारणीसाठी आवश्यक जागेवरून सुरू असलेल्या खटल्यात उच्च न्यायालयाने ऐतिहासिक निर्णय देत शेतकी संस्थेची २१० एकर जागा शासनाच्या ताब्यात घेण्याचे आदेश दिले आहेत.
या पार्श्वभूमीवर सकाळी सुमारे ११ वाजता जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी संबंधित जागेची प्रत्यक्ष पाहणी केली. शहराच्या मोठ्या भागात विस्तारलेल्या आणि दोन महत्त्वाच्या रस्त्यांनी जोडलेल्या या परिसरात महाविद्यालयासाठी कोणती जागा अधिक योग्य ठरेल, रस्ते विस्तार कसे करता येतील, पर्यायी मार्गांची आखणी कशी करता येईल, याची सखोल पाहणी करण्यात आली.
यावेळी उल्हासनगरचे उपविभागीय अधिकारी विजयानंद शर्मा, तहसीलदार अमित पुरी यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
विद्यार्थ्यांशी संवाद
पाहणीनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी सध्या सुरू असलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या जागेला भेट देत विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधला. विद्यार्थ्यांच्या अडचणी, सुविधा आणि भविष्यातील अपेक्षा जाणून घेत त्यावर सकारात्मक तोडगा काढण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
बदलापुरातील सांडपाणी व अनधिकृत बांधकामांचा आढावा
कुळगाव–बदलापूर नगर परिषद हद्दीतील एका गृहसंकुलाच्या सांडपाणी व्यवस्थेच्या प्रश्नावर उच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. या सुनावणीदरम्यान शहरातील सांडपाणी व्यवस्था आणि अनधिकृत बांधकामांचा मुद्दा ऐरणीवर आला असून, न्यायालयाने यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी बदलापुरातील सांडपाणी प्रक्रिया केंद्राची पाहणी केली. सांडपाणी कुठे आणि कसे सोडले जाते, प्रक्रिया प्रकल्पांची क्षमता किती आहे, याची सविस्तर माहिती त्यांनी घेतली.
४ हेक्टर जागा अतिक्रमणमुक्त
अनधिकृत बांधकामांवरील कारवाईचा आढावा घेताना नगर परिषदेच्या कारवाईतून सुमारे ४ हेक्टर जागा मोकळी करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. ही जागा तात्काळ ताब्यात घेऊन पुन्हा अतिक्रमण होऊ नये यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.
सांडपाणी प्रकल्पाबाबत महत्त्वाच्या सूचना
यावेळी बोलताना जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ म्हणाले,“न्यायालयाच्या निर्देशानुसार बदलापुरातील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांची पाहणी केली आहे. सांडपाणी कुठे जाते, प्रकल्पांची क्षमता काय आहे, याचा अभ्यास करून आवश्यक उपाययोजना सुचवण्यात आल्या आहेत. १२ दशलक्ष लिटर क्षमतेचा सांडपाणी प्रकल्प लवकरच सुरू होणार आहे. तोपर्यंत सांडपाणी पंपांच्या माध्यमातून वळवण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच सांडपाण्यावर तृतीय स्तराची प्रक्रिया करण्यासाठी आवश्यक ती मदत केली जाईल.”
अहवाल न्यायालयात सादर होणार
अंबरनाथ व बदलापूरमधील या पाहणीदरम्यान न्यायालयाच्या आदेशानुसार सुरू असलेल्या प्रकरणांमध्ये स्थानिक प्रशासनाच्या कामकाजाची सखोल तपासणी (झाडाझडती) करण्यात आली असून, यासंबंधीचा सविस्तर अहवाल लवकरच उच्च न्यायालयात सादर केला जाणार आहे.











