‘फू बाई फू’, ‘चला हवा येऊ द्या’ यांसारख्या गाजलेल्या कायक्रमातून प्रेक्षकांना पोट धरून हसवणारा लोकप्रिय मराठमोळा कलाकार सागर कारंडे सध्या ‘बिग बॉस मराठी ६’ च्या घरात दिसतोय. घरात सागर टास्क खेळताना दिसतोय, नेटकरीही त्याचं कौतुक करतायत.
त्याचं ‘चला हवा येऊ द्या’ मधील पोस्टमनचं पात्र कुणीही विसरू शकत नाही. मात्र गेले कित्येक दिवस सागर इंडस्ट्रीमधून गायब होता. तो कोणत्याही नव्या प्रोजेक्टमध्ये दिसत नव्हता. तो थेट ‘बिग बॉस मराठी’च्या घरात दिसला. शो मध्ये जाण्यापूर्वी सागरने केलेल्या खुलाश्यामध्ये त्याच्या पाठीमागे कारस्थानं करण्यात आली असं म्हटलंय.
त्यामुळे माझी नाती खूप तुटलीयेत
सागरने राजश्री मराठीला मुलाखत दिली. यात बोलताना तो म्हणाला, ‘माझ्या स्पष्ट बोलण्याचा खूप तोटा झालाय. आपण जर समोरच्याला एखादी गोष्ट सांगितली की ए असं नको असं कर त्याला राग यायचा. कुणीही असेल मग तो. दिग्दर्शक असेल, लेखक असेल, निर्माता असेल. आपण सांगणंच चुकीचं आहे असं वाटतं मला. पण नाही यार खटकतं मला ते कुठेतरी की आपण सांगायला तरी पाहिजे काय नंतर व्हायचं ते होउदे. माझ्या मनात काय चालूये हे त्याला सांगितलं पाहिजे. त्यामुळे माझी नाती खूप तुटलीयेत. मित्र तुटलेत. मित्र म्हणता नाही येणार. मी समजत होतो मित्र. की हे मित्र आहेत माझे पण तसं नसतं. ते या गेल्या काही वर्षात जाणवलं मला.’
लोक आपल्याला गृहीत धरतात
सागर पुढे म्हणाला, ‘आपल्याच मित्रांनी आपल्यामागे काही कारस्थान करावं तर ती मैत्री नाही ना मग, ती कसली मैत्री. तुमचा वापर जर टिशू पेपरसारखा होत असेल. नंतर नंतर मी ठरवलं की जाऊदे आपण बोलूयाच नको. मी असा विचार का करतो बोलूया नको कारण समोरच्याला वाईट वाटेल. मग समोरच्याचा असाही समज होतो की अरे त्याचं काय, तो बोलत नाही काही नाही. त्याला आपण सहज फसवू शकतो. त्याच्यासोबत राजकारण करू शकतो. असंही वाटतं लोकांना. बोललं तरी प्रॉब्लेम, नाही बोललं तरी प्रॉब्लेम. म्हणजे लोक आपल्याला गृहीत धरतात. की हा काहीच करू शकत नाही. त्याला आपण कधीही जाळ्यात अडकवू शकतो. आणि ते बरं झालं. खूप लवकर आले अनुभव. माणसं कळली. मी आता पटकन माणसांना ओळखतो.’











