पुणे जिल्ह्यात वाढत चाललेल्या मानव-बिबट संघर्षाच्या पार्श्वभूमीवर जुन्नर वनविभागाच्या वतीने आपत्तकालीन प्रतिसाद दलासाठी विशेष प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. घोडेगाव येथे मंगळवार, २७ जानेवारी रोजी हा प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला.
पुणे जिल्ह्यातील आंबेगाव, जुन्नर, शिरूर आणि खेड तालुक्यांतील एकूण २३३ गावांना जून २०२४ मध्ये बिबट हल्ल्यांच्या वाढत्या घटनांमुळे ‘आपत्ती क्षेत्र’ म्हणून घोषित करण्यात आले आहे. डेहराडून येथील भारतीय वन्यजीव संस्थेने केलेल्या अभ्यासानुसार जुन्नर व परिसरात प्रति १०० चौरस किलोमीटर क्षेत्रात सहा ते सात बिबट्यांची घनता आढळून आली आहे. या पार्श्वभूमीवर बिबट हल्ल्यांचा धोका कमी करणे, तत्पर प्रतिसाद देणे तसेच मदत व बचाव कार्य अधिक प्रभावी करण्याच्या उद्देशाने हे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले.
वनसंरक्षक आशिष ठाकरे (पुणे) यांच्या संकल्पनेतून आणि उप वनसंरक्षक प्रशांत खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रशिक्षण कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. जुन्नर वनविभागाचे बहुतांश क्षेत्र डोंगराळ असून घोड व कुकडी प्रकल्पांतर्गत डिंभे, माणिकडोह, पिंपळगाव जोगा, वडज, चिल्हेवाडी व चासकमान धरणांमुळे सिंचन सुविधा वाढल्या आहेत. त्यामुळे ऊस, केळी, द्राक्ष, डाळिंब यांसारख्या बागायती पिकांचे क्षेत्र वाढले असून बिबट्यांसाठी लपण्यासाठी अनुकूल अधिवास आणि भक्ष्य सहज उपलब्ध होत आहे.
या प्रशिक्षणात जुन्नर, ओतूर, मंचर, घोडेगाव, खेड, चाकण व शिरूर वनपरिक्षेत्रातील आपत्तकालीन प्रतिसाद दलाचे ५१ सदस्य तसेच वनविभागाचे २८ क्षेत्रीय कर्मचारी सहभागी झाले होते. रेस्क्यू चॅरिटेबल ट्रस्ट, पुणे येथील तज्ज्ञांकडून प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांद्वारे प्रशिक्षण देण्यात आले.
रेस्क्यू चॅरिटेबल ट्रस्टचे नचिकेत उत्पात व किरण रहाळकर यांनी बिबट्याचा शोध, माग काढणे, नियंत्रण, पिंजरे लावणे तसेच ट्रॅप कॅमेरे व ड्रोनच्या वापराविषयी मार्गदर्शन केले. याचबरोबर नचिकेत अवधानी व श्रेयस कांबळे यांनी अंधारात, ऊसशेतीत व दाट झाडीत शोध अधिक प्रभावी करण्यासाठी थर्मल कॅमेरा ड्रोनच्या वापराचे प्रात्यक्षिक सादर केले.
बिबट हल्ल्याच्या घटनांमध्ये आपत्तकालीन प्रतिसाद दलाची भूमिका, घटनास्थळी तात्काळ पोहोचणे, वनविभाग, पोलिस व आरोग्य विभागाशी समन्वय साधणे, नागरिकांची सुरक्षितता, जखमींना तातडीची वैद्यकीय मदत, जनजागृती तसेच प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
प्रशिक्षण कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहाय्यक वनसंरक्षक अमृत शिंदे यांनी केले, तर सहाय्यक वनसंरक्षक स्मिता राजहंस यांनी आभार मानले. यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप चव्हाण (जुन्नर), चैतन्य कांबळे (ओतूर), यश जाधव (खेड), विकास भोसले (मंचर), कुणाल लिमकर (घोडेगाव) तसेच मानद वन्यजीव रक्षक धनंजय कोकणे यांच्यासह अनेक अधिकारी उपस्थित होते.











