April 20, 2026 12:55 am

मेहुण्याने दारूची बाटली फोडून भावोजीचा गळा चिरला

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

कुटुंबाच्या विरोधात जाऊन प्रेमसंबंधातून विवाह केल्याचा राग मनात धरून मेहुण्यानेच भावोजीची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना पांगरी (ता. बार्शी) येथे घडली आहे. हॉटेलमध्ये जेवणादरम्यान मद्यधुंद अवस्थेत वाद विकोपाला गेल्यानंतर आरोपी मेहुण्याने बहिणीच्या डोळ्यादेखत दारूची बाटली फोडून भावोजीच्या गळ्यावर वार केल्याने तरुणाचा मृत्यू झाला.

या प्रकरणी वैजिनाथ बंकट क्षीरसागर यांनी पांगरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सुशील क्षीरसागर व रेश्मा यांचा प्रेमविवाह झाला होता. मात्र या विवाहाला रेश्माच्या कुटुंबीयांचा तीव्र विरोध होता. सुशील व रेश्मा हे दोघे कामानिमित्त पुण्यात वास्तव्यास होते. सुशीलच्या मावशीच्या कार्यक्रमासाठी ते येडेश्वरी येथे आले होते. त्यानंतर उक्कडगाव येथे सासू-सासऱ्यांकडे भेटीसाठी गेले होते.

दरम्यान, बुधवारी रात्री सुमारे सातच्या सुमारास आरोपी ऋषिकेश याने सर्वांनी मिळून जेवायला जाऊ, असा प्रस्ताव ठेवला. त्यानुसार सुशील, पत्नी रेश्मा, भाऊ ऋषिकेश, त्याची मैत्रीण काजल सुरज मिसाळ आणि मामा मच्छिंद्र भीमा चव्हाण हे सर्वजण पांगरी येथील ‘हॉटेल शिवनेरी’ येथे जेवणासाठी गेले होते.

जेवण सुरू असताना रेश्माच्या विवाहावरून वादाला तोंड फुटले. “दोघांची आडनावे एकच असताना हे लग्न कसे केले?” असा सवाल आरोपी ऋषिकेशने केला. त्यावर रेश्माने, “आमचे प्रेमसंबंधातून लग्न झाले आहे, तू त्यात पडू नकोस,” असे स्पष्ट सांगितले. याच कारणावरून सुशील व ऋषिकेश यांच्यात जोरदार वाद झाला.

वाद विकोपाला गेल्यानंतर मद्यधुंद अवस्थेत आरोपी ऋषिकेशने हातातील दारूची बाटली फोडत सुशीलच्या गळ्यावर वार केला. या हल्ल्यात सुशील गंभीर जखमी झाला असून त्याच्या गळ्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव सुरू झाला. हॉटेल मालक अण्णा घावटे यांनी तातडीने सुशीलला खासगी वाहनातून पांगरी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. पुढील उपचारासाठी त्याला बार्शी येथील जगदाळेमामा रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्याचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.

दारूची बाटली फोडून गळ्यावर वार केल्याने हॉटेलमधील जेवणाच्या टेबलासह संपूर्ण परिसर रक्ताने माखला होता. टेबलावर व जमिनीवर रक्ताच्या चिळकांड्या उडाल्याने हॉटेलमध्ये एकच खळबळ उडाली. या भीषण प्रसंगामुळे उपस्थितांचे धाबे दणाणल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

मयत सुशील क्षीरसागर याचे दहावीपर्यंतचे शिक्षण बार्शी येथे झाले होते. लग्नानंतर तो पुण्यात ड्रायव्हिंगचे काम करत होता. पत्नी रेश्मा ही खासगी रुग्णालयात नर्स म्हणून कार्यरत होती. दोघांचा संसार सुखाने सुरू होता. मात्र कुटुंबातील राग आणि वादातून घडलेल्या या घटनेने रेश्माच्या आयुष्याचे कुंकू पुसले गेले असून संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!