मुंबई : दहिसर ते मिरा-भाईंदर मेट्रो ९ मार्गिकेतील मिरा-भाईंदर येथे उभारण्यात आलेला तिसरा दुमजली उड्डाणपूल सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. चार मार्गिकांचा पूल पुढे जाऊन दोन मार्गिकांमध्ये परिवर्तित होत असल्याने वाहतूक कोंडी निर्माण होण्याची तसेच अपघातांचा धोका वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणावर (एमएमआरडीए) जोरदार टीका होत असून समाज माध्यमांवर या पुलाच्या रचनेची खिल्ली उडवली जात आहे.
मेट्रो ९ मार्गिकेच्या खांबांमुळे मिरा-भाईंदर परिसरातील प्रमुख रस्ते अरुंद झाले असून त्यामुळे भविष्यात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. याच समस्येवर तोडगा काढण्यासाठी एमएमआरडीएने मिरा-भाईंदर परिसरात तीन दुमजली उड्डाणपूल उभारण्याचा निर्णय घेतला होता. यापैकी दोन दुमजली पूल आधीच पूर्ण होऊन वाहतूक सेवेत दाखल झाले आहेत.
तिसरा दुमजली उड्डाणपूल मिरा-भाईंदर येथील जुना पेट्रोल पंप ते फाटक मार्गावरील आझाद मैदानापर्यंत सुमारे १८०० मीटर लांबीचा असून तो बांधकामाच्या दृष्टीने पूर्ण झाला आहे. सध्या केवळ अंतर्गत व सुरक्षिततेशी संबंधित काही कामे शिल्लक असून फेब्रुवारी महिन्यात हा पूल वाहतूक सेवेत दाखल करण्याचे नियोजन एमएमआरडीएकडून करण्यात आले आहे. मात्र, सेवेत येण्यापूर्वीच या पुलाच्या रचनेवरून वाद निर्माण झाला आहे.
समाज माध्यमांवर या पुलावरून होणाऱ्या टीकेनंतर एमएमआरडीएने खुलासा करत पुलाच्या रचनेत कोणताही दोष नसून पूल पूर्णपणे सुरक्षित असल्याचा दावा केला आहे. भविष्यात हा पूल भाईंदर पश्चिम-पूर्व दिशेने विस्तारण्यात येणार असल्यानेच चार मार्गिकांवरून दोन मार्गिकांची रचना करण्यात आल्याचे स्पष्टीकरण एमएमआरडीएकडून देण्यात आले आहे.
दरम्यान, वाहनचालक आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना करण्यासाठी एमएमआरडीएने हालचाली सुरू केल्या आहेत. गुरुवारी वाहतूक पोलिसांनी एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांसह या पुलाची संयुक्त पाहणी केली. पाहणीनंतर वाहतूक पोलिसांनी दुभाजक उभारणी, योग्य दिशादर्शक व वाहतूक चिन्हे लावणे तसेच इतर सुरक्षिततेच्या उपाययोजना सुचविल्या आहेत.
या सर्व उपाययोजनांची अंमलबजावणी केल्यानंतरच हा उड्डाणपूल वाहतूक सेवेत दाखल करण्यात येणार आहे. त्यामुळे आता हा पूल फेब्रुवारीअखेरीस वाहनचालकांसाठी खुला होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. एमएमआरडीएकडून पूल सेवेत आल्यानंतर कुठेही वाहतूक कोंडी होणार नाही आणि पूल पूर्णपणे सुरक्षित ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.











