April 20, 2026 2:12 am

मला सगळ्याचा कंटाळा आलाय; मृत्यूच्या पाच दिवस आधी अजित पवार असं का म्हणाले?

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बुधवारी बारामती येथे विमान कोसळून झालेल्या अपघातामध्ये निधन झाले. अजित पवार यांच्या निधनाने महाराष्ट्राला मोठा धक्का बसला आहे. नुकत्याच झालेल्या राज्यातील महानगरपालिका निवडणुकीत अजित पवार  यांनी महाराष्ट्र पिंजून काढला होता. अजित पवार यांनी प्रचारसभांचा सपाटा लावला होता. मात्र, यानंतही अजित पवार यांना महानगरपालिका निवडणुकांमध्ये अपेक्षित यश मिळाले नव्हते. तरीही अजित पवार हे अपयश विसरुन जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या प्रचारासाठी नव्या जोमाने कामाला लागले होते. मात्र, गेल्या काही काळातील वाद, आरोप आणि अपयशाची टोचणी अजित पवार यांच्या मनाला कुठेतरी सलत होती. त्यामुळेच अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वीच ‘आता हे सगळं नको वाटतंय, बास झालं’, अशी भावना आपले जवळचे सहकारी किरण गुजर यांच्याकडे बोलून दाखवली होती.

अजित पवार राज्याचे राजकारण करत असताना त्यांचा बारामतीचा आणि सांभाळला तो किरण गुजर यांनी. अजित पवारांनी पहिली निवडणूक लढविली ती 1984 साली छत्रपती सहकारी साखर कारखान्याची. या निवडणुकीत अजित पवारांनी उभं रहावं यासाठी किरण गुजर यांनी त्यांच मन वळवलं‌. कारण अजित पवार त्यावेळी राजकारणात यायला तयार नव्हते. मात्र छत्रपती कारखान्याची निवडणूक अजित पवारांनी जिंकली आणि त्यांचा राजकीय प्रवास सुरू झाला. सुरुवातीला अजित पवार मंदिरामध्ये जायचे नाहीत, देवाबद्दल त्यांचे विचार वेगळे होते. मात्र हळूहळू त्यांच्यात बदल होत गेल्याच किरण गुजर यांनी पाहिलं. मागील आठवड्यात किरण गुजर यांना अजित भेटले असता त्यांनी राजकारणातुन बाजुला व्हावं आणि थांबावं अशी भावना त्यांच्याकडे बोलून दाखवली होती.

अजित पवार आणि माझं पाच दिवसांपूर्वीच बोलणं झालं होतं. ते मला म्हणाले की, कंटाळा आलाय, आपण दोघे बाहेर जाऊ या. आम्ही दोघे बाहेर गेलो, अर्धा दिवस बाहेर फिरलो, जेवलो. तेच माझं अजितदादांसोबतचं शेवटचं जेवण ठरलं. त्यावेळी अजितदादा मला म्हणाले की, मला आता नको वाटतंय. बास वाटतंय आता मला. या सगळ्या गोष्टींचा मला त्रास होतोय. अजितदादा अलीकडे असं का बोलत होते, हे समजत नव्हतं, असे किरण गुजर यांनी म्हटले.

माझ्या वाट्याला गालबोट का लागतंय?

अजित पवार अत्यंत हळव्या मनाचे होते. मी एवढं मरमर काम करतोय, रात्रंदिवस काम करतोय, तरी माझ्या वाट्याला गालबोट का लागतंय?, असे अजित पवार म्हणत होते. लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर अजितदादा विधानसभा निवडणुकीत उभे राहायला तयार नव्हते. मी त्यांना तयार केलं. लोक असे वागतात, बारामतीमध्ये माझ्यावर टीका का केली जाते, मी कोणाचं वाईट केलंय, असे अजितदादा विचारायचे. अलीकडे त्यांचं मन विचलित झालं होतं, असे किरण गुजर यांनी म्हटले.

अजित पवार यांची देवावर श्रद्धा होती

अजित पवारांचं व्यक्तिमत्व सुरुवातीच्या काळात करडं होतं. ते अलीकडच्या काळात अनुभवाने आणि वयामुळे बदलायला लागलं होतं. अगोदरच्या काळात अजितदादांना सांगायला लागायचं ‘अमक्या देवाला जाऊ’. तेव्हा अजितदादा म्हणायचे, देवाने माझं काय केलंय, लहानपणी वडील गेले, कुटुंबावर ही परिस्थिती आली. त्यावेळी देव आणि ईश्वर संकल्पनेबाबत अजित पवार यांची वेगळी भावना होती. अजित पवार यांची देवावर श्रद्धा होती, पण अंधश्रद्धा नव्हती. त्यांनी या श्रद्धेचा वापर कधीही राजकारणासाठी केला नाही, असेही किरण गुजर यांनी सांगितले.

मला राजकारणात यायचं नाही, मला माझा प्रपंच बघायचाय

किरण गुजर यांनी अजित पवारांविषयीच्या आठवणी सांगताना म्हटले की, 1986 साली मी इंदिरा काँग्रेसमध्ये काम करत होतो. 1984 साली अजित पवार छत्रपती कारखान्याच्या निवडणुकीला उभे राहिले. तेव्हापासून आमचे ऋणानुबंध होते. त्यावेळी मी म्हणायचो, पवार कुटुंबातील तरुण नेतृत्त्वाने पुढे यायला हवे. समाजातील लोकांशी संवाद साधायचा असेल तर तरुण पिढी राजकारणात आली पाहिजे, असे मी सांगायचो. पण अजित पवार त्यावेळी तयार होत नव्हते. मला माझं घर, प्रपंच बघायचा आहे, असे ते सांगायचे. पण ते नंतर बारामतीकरांसाठी राजकारणात आले, असे किरण गुजर यांनी सांगितले.

माझ्या डोळ्यांसमोरच अजितदादांचं विमान कोसळलं

अजित पवार यांनी काल विमानात बसण्यापूर्वी मला फोन केला होता. मी विमानात बसतोय, असे त्यांनी सांगितले. मी त्यांना घ्यायला विमानतळावर गेलो होतो. माझ्या डोळ्यांसमोरच त्यांचे विमान कोसळले. अजित पवारांचा मृतदेह गाडीत घालताना मी ओळखलं हे दादा आहेत. आपल्याला काहीतरी वाईट स्वप्न पडलंय, असं वाटत होतं. पण दुर्दैवाने ही घटना खरी ठरली. आज काय होतंय, यावर अजूनही आमचा विश्वास बसत नाही, असे किरण गुजर यांनी सांगितले.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!