राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर आज (29 जानेवारी) बारामतीतील विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. दुर्घटनेची माहिती मिळाल्यापासून अजित पवारांच्या कार्यकर्त्यांचा आणि त्यांना मानणाऱ्या नागरिकांचा कालपासून बारामतीत मोठा जनसागर लोटला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. या दुर्घटनेच्या आदल्या दिवशी अजित पवारांच्या चालकाने त्यांना रात्रीच गाडीने पुण्याला जाऊ असं म्हटलं होतं, पण अजित पवारांनी ते ऐकलं नाही, आणि आज मी माझं सर्वस्व गमावल्याची भावना चालक श्यामराव नारायण मनवे यांनी व्यक्त केल्या आहेत.
तू पुण्याला ये, मी सभा आटोपून पुण्यात येतो
चालकांनी याबाबत एका वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितलं की, मुंबईतील दादांच्या मीटिंग्स रात्री लवकरच संपल्या होत्या. यामुळे आम्ही दादांना आपण रात्रीच कारने बारामतीला जाऊ असे म्हणालो होतो; पण दादांच्या पुढे कोण जाणार? दादा मला म्हणाले, तू पुण्याला ये, मी सभा आटोपून पुण्यात येतो; मात्र बुधवारी सकाळीच ही दुर्दैवी घटना घडली. आता माझं आयुष्यच थांबलं आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चालक श्यामराव नारायण मनवे (वय ७१) यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
अजित पवारांच्या विमान अपघाताचा संपूर्ण घटनाक्रम-
– पुणे-बारामती परिसरात दाट धुके, दृश्यमानता अत्यंत कमी होती.
– बारामतीचे विमानतळ लहान आहे आणि त्याच्याकडे
– ILS (Instrument Landing System) सुविधा नाहीत.
– पायलटला मॅन्युअल लँडिंग करावी लागली.
– विमानाने रनवेवर थेट प्रवेश केला नाही, तर मोठा वळसा घेतला.
– याचा अर्थ पहिला लँडिंग प्रयत्न रद्द (aborted) केला गेला.
– धुक्यात रनवेवर (align) करणे कठीण झाले.
– दुसरा लँडिंग प्रयत्न केला गेला.
– DGCAच्या सूत्रांनुसार, हे टेबल-टॉप रनवे आहे.
– लँडिंगदरम्यान विमान रनवेच्या कडेला कोसळले.
– सुमारे 100 फूट उंचीवर विमानाचा तोल गेला.
– रनवेपर्यंत पोहोचण्याआधीच विमान जमिनीवर आदळले.
– आदळल्यावर मोठा स्फोट झाला, त्यानंतर अनेक लहान स्फोट झाले.
– विमानात भीषण आग लागली.
– आगीमुळे तात्काळ बचावकार्य शक्य झाले नाही.
– अपघाताचा तपास चालू आहे; DGCA अहवालानंतर अंतिम कारण निश्चित होईल.











