April 23, 2026 5:10 pm

उजव्या बाजूला हृदय असलेल्या 70 वर्षीय आजींवर यशस्वी अँजिओप्लास्टी

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

शरीराच्या रचनेत प्रत्येक अवयवांची एक जागा निश्चित आहे. शरीराच्या आत आणि बाहेरसुद्धा अवयव हे आपल्या निर्धारित ठिकाणी असतील तरच ती व्यक्ती सर्वसाधारणपणे निरोगी आयुष्य जगते. शरीराच्या आत सर्वात महत्वाचा आणि प्रमुख अवयव म्हणजेच हृदय. सर्वांच्या शरीरात हृदय हे छातीमध्ये डाव्या बाजूला असतं. मात्र, जगात असे काही दुर्मीळ लोक सुद्धा आहेत ज्यांचं हृदय शरीरात उजव्या बाजूला आहे. विश्वास बसत नाही ना, हे सत्य आहे. जगात एक दोन टक्केच लोक असतील ज्यांच्या शरीरात हृदय हे उजव्या बाजूला असण्याची शक्यता असते. अशीच एक केस नागपुरात समोर आली आहे.

 

उजव्या बाजूला हृदय :

नागपूर जिल्ह्यातील सावनेर येथील निवासी 70 वर्षीय एका आजींच्या शरीरात हृदय हे उजव्या बाजूस असल्याचं तपासणीत समोर आलय. नागपूर येथील लता मंगेशकर हॉस्पिटल येथील हृदयरोग विभागात 70 वर्षीय आजी आल्यानंतर ही बाब समोर आली. हृदयरोगतज्ज्ञ हितेंद्र भागवतकर यांच्या मते ही भारतातील दुर्मीळ केस असावी.

 

लता मंगेशकर हॉस्पिटलमध्ये उपचार :

70 वर्षीय आजीच्या छातीमध्ये दुखत असल्यानं त्यांना श्वास घेण्यासाठी त्रास होत होता. त्यामुळं त्यांना नागपूरच्या लता मंगेशकर हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. सुरुवातीला त्यांची तपासणी करण्यात आली आणि ईसीजी काढण्यात आला. ईसीजीमध्ये हृदयाशी संबंधित बदल दिसून आले.

हृदय तपासणीत झालं उघड :

डॉक्टरांनी आजीच्या हृदयाची पुन्हा तपासणी सुरू केली. त्यावेळी प्रसिद्ध हृदयरोगतज्ञ डॉ. हितेंद्र भागवतकर यांना एक वेगळी बाब लक्षात आली, ती म्हणजे इको तपासणी करताना हृदय नेहमी जिथं असतं तिथं दिसत नव्हतं. त्यामुळं त्यांना शंका आली की, रुग्णाचं हृदय कदाचित उलट बाजूला असावं. तपासणी केल्यानंतर असं लक्षात आलं की, त्या महिलेचं हृदय उजव्या बाजूला आहे.

 

सर्व रक्तवाहिन्या उलट बाजूने:

दुर्मीळ निदान केल्यानंतर डॉ. हितेंद्र भागवतकर यांनी त्या आजीची तत्काळ अँजिओग्राफी केली. हृदयाची रचना ही वेगळी असल्यामुळं उपचाराची प्रक्रिया खूपच अवघड आणि जटिल होती. हृदयाच्या सर्व रक्तवाहिन्या उलट बाजूने होत्या, तरी देखील सर्व डॉक्टरांच्या अनुभवी टीमने यशस्वीपणे अँजिओग्राफी केली. त्यामध्ये हृदयाच्या मुख्य रक्तवाहिनीत म्हणजेच LAD धमनीमध्ये 90 टक्के अडथळा आढळून आला. त्यानंतर सर्व खबरदारी घेऊन रुग्णावर यशस्वी अँजिओप्लास्टी करण्यात आली. सध्या आजींची प्रकृती ठणठणीत आहे. उपचारानंतर कोणतीही अडचण आली नाही. त्यांना चांगल्या अवस्थेत घरी पाठवण्यात आल्याची माहिती, हृदयरोगतज्ञ हितेंद्र भागवतकर यांनी दिली.

 

डॉक्टरांचे अभिनंदन :

भारतातील अशा प्रकारची दुर्मीळ केस यशस्वीरित्या हाताळल्याबद्दल संस्थेचे उपाध्यक्ष आमदार डॉ. आशिष देशमुख, एनकेपी साळवे वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा, उपअधिष्ठाता व वैद्यकीय अधीक्षक डॉ. नितीन देवस्थळे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अनुज तिवारी, उपवैद्यकीय अधीक्षक डॉ. सुश्रुत फुलारे आदींनी हृदयरोग विभाग चमूचं अभिनंदन केलं.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!