महिला प्रीमियर लीग (WPL 2026) च्या 12व्या सामना, गुजरात जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात वडोदरा इथं खेळवण्यात आला. या सामन्यात गुजरातला दारुण पराभव पत्करावा लागला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुनं गुजरात जायंट्सचा 61 धावांनी पराभव केला आणि हंगामातील त्यांचा सलग पाचवा विजय नोंदवला. यासह WPL 2026 प्लेऑफसाठी पात्र ठरणारा RCB पहिला संघ ठरला. RCB आता 10 गुणांसह पॉइंट टेबलमध्ये अव्वल स्थानावर आहे. WPL मध्ये हा RCB चा सलग सहावा विजय आहे. या हंगामात सलग पाच विजय नोंदवण्याव्यतिरिक्त, मंधानाच्या संघानं गेल्या हंगामात लीग टप्प्यात विजयासह आपला मोहीम संपवली होती.
गुजरातची निराशजनक कामगिरी :
आरीबीनं दिलेल्या 179 धावांचा पाठलाग करताना गुजरातची सुरुवात निराशाजनक झाली. संघानं फक्त 56 धावांमध्ये 6 गडी गमावले. यानंतर कर्णधार अॅशले गार्डनरनं भारतीसह डाव वाचवण्याचा प्रयत्न केला पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. अॅशले गार्डनर 17व्या षटकात 54 धावा काढून बाद झाली. त्यानंतर 20० षटकांच्या अखेरीस गुजरात संघ 8 बाद केवळ 117 धावा करु शकला. आरसीबीकडून सायली सातघरे आणि नदीन डी क्लार्क यांनी प्रत्येकी 2 बळी घेतले. तर लॉरेन बेल, राधा यादव आणि श्रेयंका पाटील यांनी प्रत्येकी 1 बळी घेतला.
गौतमी नाईकची दमदार खेळी :
तत्पुर्वी प्रथम फलंदाजी करताना आरसीबीच्या डावाची सुरुवात चांगली झाली नाही. पहिल्या दोन षटकांत त्यांना दोन मोठे धक्के बसले. पहिल्याच षटकात रेणुका सिंगनं 1 धावेवर सलामीवीर ग्रेस हॅरिसला बाद केलं. तर पुढच्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर जॉर्जिया वोलही 1 धाव घेऊन बाद झाली. त्यानंतर 10 व्या षटकात कर्णधार स्मृती मंधाना 26 धावा काढून बाद झाली. त्यानंतर काही वेळातच गौतमी नाईकनं तिचं अर्धशतक पूर्ण केलं. 17व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर सोफी डेव्हिननं ऋचा घोषला बाद केलं. पुढच्याच षटकात गौतमी नाईकही 73 धावा करुन बाद झाली. परिणामी 20 षटकांच्या अखेरीस आरसीबीनं 178 धावा केल्या.











