भाजप–शिंदे सेना–ठाकरे गटात पडद्यामागे हालचालींना वेग
मुंबई :
महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या राजकीय भूकंपाची शक्यता निर्माण झाली असून, महापालिका निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर महापौर पदावरून महायुतीत तणाव वाढल्याचं चित्र दिसत आहे. राज्यातील २९ महापालिकांमध्ये भाजपने सर्वाधिक जागा जिंकल्या असतानाही, महापौर पदावरून सुरू झालेल्या हालचालींमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
महापालिका निकालानंतर मुंबईत तथाकथित ‘हॉटेल पॉलिटिक्स’ जोरात सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. शिंदे गटाचे नगरसेवक पंचतारांकित हॉटेलमध्ये मुक्कामी असल्याची चर्चा असून, शिंदे सेनेनं अडीच वर्षांसाठी महापौर पदाची मागणी केल्याचं बोललं जात आहे. ही मागणी भाजपच्या नेतृत्वाला मान्य नसल्यामुळे पडद्यामागच्या हालचालींना वेग आला आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. विशेषतः कल्याण-डोंबिवलीतील फोडाफोडीला ब्रेक लावण्यासाठी भाजप आणि ठाकरे गटात समेटाची शक्यता वर्तवली जात आहे.
महापौर पदासोबतच स्थायी समिती आणि बेस्ट समिती अध्यक्षपद देण्यासही शिंदे सेनेचा भाजपला नकार असल्याची माहिती आहे. त्यामुळे शिंदे सेनेला शह देण्यासाठी भाजपकडून ठाकरे गटासोबत छुप्या युतीचा पर्याय तपासला जात असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर महापौर निवडणुकीदरम्यान ठाकरे गटाचे काही नगरसेवक गैरहजर राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, या सर्व चर्चांवर शिंदे गट आणि भाजपकडून अधिकृतपणे इन्कार करण्यात आला आहे.
“महायुती अतिशय मजबूत आहे. महापौर महायुतीचाच होणार असून सध्या इतर कोणाशीही चर्चा सुरू नाही,” असं शिंदे गटाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.
दुसरीकडे, खासदार संजय रावत यांनी थेट दिल्लीवर बोट ठेवत शिंदे गटाला टोला लगावला आहे. “शिंदे गटाला दिल्लीहून चावी दिली जातेय, फडणवीस यांना महापौर होऊ नये यासाठीच हे राजकारण सुरू आहे,” असा आरोप त्यांनी केला आहे.
मुंबईत वाढलेल्या राजकीय हालचालींच्या पार्श्वभूमीवर भाजपही सतर्क झाली असून, २२ जानेवारी रोजी महापौर पदाच्या आरक्षणाची सोडत जाहीर होणार आहे. त्याआधी भाजपनं आपल्या सर्व नगरसेवकांना मुंबई सोडू नये, अशा सूचना दिल्या आहेत.
आरक्षण जाहीर झाल्यानंतर शिंदे सेना मवाळ भूमिका घेणार की भाजप ठाकरेंशी छुपी युती करून महापौर पदाचा डाव साधणार, यावरच राज्याच्या राजकारणाची पुढील दिशा ठरणार असल्याचं स्पष्ट होत आहे.











