April 24, 2026 1:13 am

लोहगावात सांडपाणी वाहिनीचे काम संथगतीने

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

लोहगावातील संत तुकाराम महाराज मंदिर परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून सांडपाणी वाहिनीचे काम संथगतीने सुरू असल्याने स्थानिक नागरिक आणि व्यापाऱ्यांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. काम पूर्ण करण्यासाठी रस्ता खोदून ठेवण्यात आला आहे, मात्र अनेक दिवस उलटूनही हे काम मार्गी न लागल्याने या भागातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे.

 

विशेषतः लोहगाव–विमाननगर रस्ता, अंतर्गत सोसायटी रस्ते आणि शाळा–महाविद्यालयांच्या आसपासच्या भागात मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. त्यामुळे दुचाकीस्वार, पादचारी तसेच ज्येष्ठ नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. काही ठिकाणी अपघातांच्या घटनाही घडल्या असून नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

वाहतूक बंद; पर्यायी रस्त्याचाही अडथळा
सांडपाणी वाहिनीच्या कामासाठी मुख्य रस्ता खोदण्यात आल्याने या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. परिणामी, नागरिकांना लांबच्या पर्यायी रस्त्याचा अवलंब करावा लागत आहे. विशेषतः कुंभारवाडा परिसरातील नागरिकांना याचा मोठा फटका बसला आहे. नुकत्याच झालेल्या मकर संक्रांतीच्या सणादरम्यान खण आणि मातीची भांडी विक्रीसाठी नेताना येथील कारागिरांना मोठी कसरत करावी लागली.

व्यापाऱ्यांचे नुकसान आणि वेळेचा अपव्यय
रस्ता बंद असल्यामुळे व्यापाऱ्यांची वाहने दुकानांपर्यंत पोहोचू शकत नाहीत. स्थानिक व्यापारी गणेश कुंभार यांनी आपली व्यथा मांडताना सांगितले की, “वाहने आत येत नसल्यामुळे विक्रीचा माल हाताने किंवा मजुरांच्या साहाय्याने वाहून न्यावा लागतो. यात अनावश्यक वेळ आणि मेहनत वाया जात असून आर्थिक भुर्दंडही सहन करावा लागत आहे.”

आंदोलनाचा इशारा 

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर खोदलेल्या खड्ड्यांमध्ये पाणी साचत असून दुर्गंधी पसरत आहे. त्यामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. काही ठिकाणी सांडपाणी रस्त्यावर वाहत असल्याने परिसरात अस्वच्छतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

स्थानिक रहिवाशांनी अनेक वेळा संबंधित ठेकेदार आणि महापालिका प्रशासनाकडे तक्रारी करूनही ठोस कारवाई झालेली नसल्याचा आरोप केला आहे. काम वेळेत पूर्ण न झाल्यास आंदोलनाचा इशाराही नागरिकांनी दिला आहे.

प्रशासनाचे आश्वासन
या गंभीर समस्येबाबत मलनि:सारण विभागाचे मुख्य अभियंता जगदीश खानोरे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, “या प्रकरणाची मला सविस्तर माहिती नाही, परंतु मी तातडीने संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून रेंगाळलेले काम लवकरात लवकर सुरू करण्याचे आदेश देतो.”
प्रशासनाने यावर तातडीने तोडगा काढून खोदून ठेवलेला रस्ता पूर्ववत करावा आणि नागरिकांची या त्रासातून मुक्तता करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

 

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!