मुंबई आणि पुणे या राज्यातील दोन महत्त्वाच्या महानगरांदरम्यान दररोज प्रवास करणाऱ्या लाखो नागरिकांसाठी मोठा दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. मुंबई–पुणे प्रवास अधिक वेगवान, सुरक्षित आणि सुलभ करणाऱ्या नव्या सुपरफास्ट एक्सप्रेसवेच्या उभारणीस केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची घोषणा केली असून, यामुळे महाराष्ट्राच्या दळणवळण व्यवस्थेत मोठा बदल घडून येणार आहे.
सध्या अस्तित्वात असलेल्या मुंबई–पुणे एक्सप्रेसवेवरून प्रवासासाठी साधारण अडीच ते तीन तासांचा कालावधी लागतो. मात्र सुट्टीचे दिवस, पावसाळा किंवा अपघाताच्या घटना घडल्यास खंडाळा घाट परिसरात तासन्तास वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. अनेकदा हा प्रवास चार ते पाच तासांपर्यंत लांबतो. ही कायमची अडचण लक्षात घेऊन सध्याच्या एक्सप्रेसवेच्या समांतर एक नवा, अत्याधुनिक आणि अधिक वेगवान मार्ग उभारण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.
हा नवा सुपरफास्ट एक्सप्रेसवे सुमारे १३० किलोमीटर लांबीचा असणार असून, त्यासाठी अंदाजे १५ हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. हा मार्ग जेएनपीए (जवाहरलाल नेहरू पोर्ट अथॉरिटी) परिसरातील अटल सेतूजवळून सुरू होऊन थेट पुण्याजवळील शिवरे जंक्शनपर्यंत जाणार आहे. या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात पगोटे (जेएनपीएजवळ) ते पनवेल चौकापर्यंतच्या मार्गाला आधीच मंजुरी देण्यात आली आहे.
नितीन गडकरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, या एक्सप्रेसवेच्या उभारणीत आधुनिक अभियांत्रिकी तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. वेगवान वाहनांसाठी स्वतंत्र आणि सुरक्षित लेन, कमी वळणांचा मार्ग, दर्जेदार पूल तसेच आवश्यक ठिकाणी बोगद्यांचा समावेश करण्यात येणार आहे. यामुळे घाटातील धोकादायक वळणं, अपघातप्रवण भाग आणि सततची वाहतूक कोंडी टाळता येणार आहे. या नव्या मार्गामुळे मुंबई–पुणे प्रवास अवघ्या ९० मिनिटांत पूर्ण होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मिसिंग लिंकचे काम मार्चपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश एमएसआरडीसीला दिले आहेत. त्यासोबतच या प्रकल्पातील अत्याधुनिक केबल-स्टेड पुलाचे कामही अंतिम टप्प्यात आहे. पुलाच्या दोन्ही टोकांना जोडण्याचे काम वेगाने पूर्ण करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. मार्च ते एप्रिल महिन्यात ही सर्व कामे पूर्ण होतील असे अधिकाऱ्यांनी सांगितले. मिसिंग लिंक सुरू झाल्यानंतर केवळ प्रवाशांनाच नव्हे तर पुणे शहराच्या विकासालाही फायदा होणार आहे.
या प्रकल्पामुळे केवळ मुंबई–पुणेच नव्हे, तर राज्याबाहेरील प्रवासालाही मोठी चालना मिळणार आहे. गडकरी यांनी सांगितले की, हा मार्ग पूर्ण झाल्यानंतर पुणे–मुंबई–बेंगळुरू असा लांब पल्ल्याचा प्रवास साडेपाच तासांत शक्य होईल. त्यामुळे उद्योग, व्यापार, लॉजिस्टिक्स आणि पर्यटन क्षेत्राला मोठा फायदा होणार आहे. विशेषतः आयटी, ऑटोमोबाईल, बंदरांशी संबंधित उद्योग तसेच निर्यातदारांसाठी हा एक्सप्रेसवे अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.
उल्लेखनीय बाब म्हणजे, २००२ साली सुरू झालेल्या विद्यमान मुंबई–पुणे एक्सप्रेसवेचे शिल्पकार म्हणून नितीन गडकरी यांचे नाव घेतले जाते. त्या काळात हा प्रकल्प देशासाठी मैलाचा दगड ठरला होता. आता भविष्यातील वाढती वाहतूक आणि गरजा लक्षात घेऊन त्याच मार्गावर आणखी एक पाऊल पुढे टाकत, अधिक वेगवान आणि आधुनिक सुपरफास्ट एक्सप्रेसवे उभारण्यात येणार आहे.
मुंबई–पुणे दरम्यानचा हा नवा एक्सप्रेसवे केवळ एक रस्ता नसून, तो राज्याच्या आर्थिक प्रगतीचा, आधुनिक दळणवळण व्यवस्थेचा आणि प्रवाशांच्या सोयीसाठी उचललेलं एक महत्त्वाचं पाऊल असल्याचं मत व्यक्त केलं जात आहे.











