मंचर | प्रतिनिधी
शेवाळवाडी (ता. आंबेगाव) ग्रामपंचायतीच्या जलजीवन अभियानांतर्गत राबविण्यात आलेल्या घरगुती नळजोडणी योजनेतील कथित आर्थिक गैरव्यवहारासंदर्भात करण्यात आलेले सर्व आरोप पूर्णपणे निराधार, दिशाभूल करणारे आणि राजकीय हेतूने प्रेरित असल्याचा ठाम दावा आंबेगाव तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तथा शेवाळवाडीचे माजी सरपंच निलेश स्वामी थोरात यांनी केला आहे. या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष आणि पारदर्शक चौकशी व्हावी, अशी मागणी करत कोणत्याही चौकशीस आपण पूर्ण सहकार्य करू व दोषी आढळल्यास कायदेशीर कारवाईलाही सामोरे जाण्यास तयार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मंचर येथे रविवारी (२ ऑगस्ट) आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना थोरात म्हणाले की, त्यांच्या कार्यकाळात ग्रामपंचायतीमार्फत झालेल्या कोणत्याही विकासकामात आर्थिक गैरव्यवहार झालेला नाही. केवळ एका योजनेवर आरोप करण्याऐवजी त्यांच्या संपूर्ण कार्यकाळातील सर्व विकासकामांची सखोल चौकशी करण्यात यावी. सत्य जनतेसमोर येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
जलजीवन अभियानांतर्गत घरगुती नळजोडणीसाठी ग्रामस्थांकडून पैसे उकळल्याचा आरोपही त्यांनी स्पष्ट शब्दांत फेटाळून लावला. संबंधित योजना ही आंबेगाव पंचायत समितीच्या पाणीपुरवठा विभागामार्फत पूर्ण करण्यात आली होती. काम पूर्ण झाल्यानंतरच सदर योजना ग्रामपंचायतीच्या ताब्यात देण्यात आली. संबंधित विभागाकडून लेखी मोजमाप पुस्तिका (एम.बी.) प्राप्त झाल्यानंतर नियमानुसार देयकांची प्रक्रिया ग्रामपंचायतीने केली. त्यामुळे निधीच्या खर्चाशी किंवा आर्थिक व्यवहाराशी आपला कोणताही थेट संबंध नसल्याचे त्यांनी सांगितले.
प्रशासक माधुरी शेटे यांनी केलेल्या आरोपांबाबत बोलताना थोरात म्हणाले की, ग्रामपंचायतीच्या राजकीय घडामोडींमधून निर्माण झालेल्या मतभेदांमुळे हे आरोप करण्यात येत आहेत. सरपंचपदासाठी आपणच माधुरी शेटे यांना पाठिंबा दिला होता. ठरल्याप्रमाणे कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर त्यांनी राजीनामा देऊन सारिका थोरात यांना सरपंचपदाची संधी द्यायची होती. मात्र त्यांनी दिलेला शब्द पाळला नाही. त्यामुळे गावात नाराजी निर्माण झाली असून त्यातूनच राजकीय हेतूने आपल्याविरोधात आरोप करण्यात येत असल्याचा दावा त्यांनी केला.
याशिवाय, आपल्या विरोधात सादर करण्यात आलेल्या निवेदनावरील अनेक स्वाक्षरीदारांनी स्वतः भेट घेऊन त्यांची दिशाभूल करून सह्या घेतल्याचे सांगितल्याचा दावाही थोरात यांनी पत्रकार परिषदेत केला. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणामागील सत्य समोर आणण्यासाठी स्वतंत्र आणि निष्पक्ष चौकशी होणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
पत्रकार परिषदेत त्यांनी प्रशासनाकडे या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करून वस्तुस्थिती जनतेसमोर आणण्याची मागणी केली. “सत्याचा विजय नेहमीच होत असतो. थोडा धीर धरा,” अशी मिश्कील टिप्पणी करत त्यांनी आपली भूमिका पुन्हा स्पष्ट केली.
निलेश थोरात यांनी ग्रामस्थांना अफवा आणि अपप्रचारावर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले. चौकशीत सत्य समोर येईल आणि आपल्यावरील सर्व आरोप खोटे असल्याचे सिद्ध होईल, असा विश्वास व्यक्त करत त्यांनी विकासकामांच्या माध्यमातून शेवाळवाडीच्या प्रगतीसाठी आपण सातत्याने कार्यरत राहणार असल्याचेही सांगितले.










