August 5, 2026 1:28 pm

पुणे जिल्हा परिषद सदस्याविरोधात बलात्काराचा गुन्हा; लग्नाचे आमिष, आर्थिक फसवणूक आणि १४ वर्षे अत्याचाराचे आरोप

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

पुणे, प्रतिनिधी : पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य मंगेश जगताप यांच्याविरोधात लग्नाचे आमिष दाखवून वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा तसेच आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला असून, या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित प्रकरणाचा तपास माळेगाव पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला असून, आरोपीच्या अटकेसाठी विशेष पोलीस पथक रवाना करण्यात आल्याची माहिती बारामतीचे उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम यांनी दिली.

या प्रकरणामुळे पुणे जिल्हा परिषदेत खळबळ उडाली. सर्वसाधारण सभेदरम्यान तक्रारदार महिलेने अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केल्याची घटना घडली. उपस्थितांनी तत्काळ हस्तक्षेप करून तिला सुरक्षित केले आणि उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.

तक्रारदार महिलेच्या फिर्यादीनुसार, २०१२ ते २०२६ या कालावधीत आरोपीने लग्नाचे वारंवार आश्वासन देत तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. तसेच तिच्याकडून सुमारे आठ ते दहा लाख रुपये घेत आर्थिक फसवणूक केल्याचाही आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.

या प्रकरणाचा प्रारंभिक गुन्हा पुण्यातील बंडगार्डन पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला होता. मात्र कथित घटना माळेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्याने तपासासाठी गुन्हा तेथे वर्ग करण्यात आला.

माध्यमांशी संवाद साधताना तक्रारदार महिलेने सांगितले की, महाविद्यालयीन जीवनापासून तिचे आरोपीसोबत प्रेमसंबंध होते. लग्नाचे आश्वासन देत अनेक वर्षे आरोपीने तिचा विश्वास संपादन केला. दरम्यान, आरोपीने दुसरे लग्न केल्याची माहिती मिळाल्यानंतर जाब विचारला असता, आपण घटस्फोट घेतल्याची कागदपत्रे त्याने दाखवली. मात्र, तपासादरम्यान ती कागदपत्रे बनावट असल्याचे समोर आल्याचा दावा तिने केला.

फिर्यादीच्या म्हणण्यानुसार, दोघांच्या लग्नासाठी रिसॉर्टही आरक्षित करण्यात आले होते आणि त्यासंदर्भातील पुरावे तिच्याकडे आहेत. मात्र मागील काही महिन्यांपासून आरोपी तिच्याशी संपर्क टाळत होता. तसेच आरोपीच्या कुटुंबीयांसह काही नातेवाईक आणि मित्रांनीही त्याला साथ दिल्याचा आरोप तिने केला आहे.

पोलीस प्रशासनाने या प्रकरणाचा तपास सुरू ठेवला असून, आरोपीचा शोध घेण्यासाठी विशेष पथक कार्यरत आहे. तपास पूर्ण झाल्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

टीप : या प्रकरणातील सर्व आरोप हे फिर्यादीच्या तक्रारीवर आधारित आहेत. या प्रकरणाची चौकशी आणि न्यायालयीन प्रक्रिया सुरू असून, न्यायालयाने आरोपीला अद्याप दोषी ठरवलेले नाही. अंतिम सत्य न्यायालयीन निर्णय आणि अधिकृत तपासानंतरच स्पष्ट होईल.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!