August 5, 2026 12:16 pm

पावसाच्या तडाख्यात पुण्याची पर्वती टेकडी; रस्ता वाहून गेल्याने पर्यटकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

पुणे | प्रतिनिधी

पुणे शहराचे ऐतिहासिक, धार्मिक आणि पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाचे आकर्षण असलेल्या पर्वती टेकडीची अतिवृष्टीमुळे दयनीय अवस्था झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे टेकडीच्या मागील बाजूने विष्णू मंदिरापर्यंत जाणारा डांबरी रस्ता पूर्णपणे वाहून गेला असून, हा मार्ग पर्यटक आणि नागरिकांसाठी अत्यंत धोकादायक बनला आहे. विशेषतः वयोवृद्ध, लहान मुले तसेच पायऱ्या चढण्यास अडचण असलेल्या नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

पर्वती टेकडीवर दररोज पहाटेपासून मॉर्निंग वॉकसाठी शेकडो पुणेकर येतात. याशिवाय, शहरातील ऐतिहासिक वारसा आणि निसर्गरम्य वातावरण अनुभवण्यासाठी देश-विदेशातील पर्यटकही येथे मोठ्या संख्येने भेट देतात. मात्र, सध्या टेकडीच्या मागील बाजूचा रस्ता पूर्णपणे उखडून गेला असून, त्याठिकाणी मोठमोठे दगड, खोल खड्डे आणि मातीचे ढिगारे निर्माण झाले आहेत. त्यामुळे वाहनांची वाहतूक अशक्य झाली असून, पायी चालणेही धोकादायक ठरत आहे.

लक्ष्मीनगर परिसरातून रमणा गणपतीजवळून म्हाडा कॉलनीमार्गे पर्वतीच्या माथ्यावर जाण्यासाठी पूर्वी डांबरी रस्ता उपलब्ध होता. आज मात्र त्या रस्त्याचे केवळ काही डांबरी अवशेषच शिल्लक राहिले आहेत. मुसळधार पावसाच्या पाण्याने रस्ता अक्षरशः वाहून गेला असून, या मार्गावरून ये-जा करणाऱ्यांना मोठी कसरत करावी लागत आहे. स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा याकडे प्रशासनाचे लक्ष वेधले असले तरी अद्याप दुरुस्तीचे काम सुरू झाले नसल्याची खंत व्यक्त केली जात आहे.

याशिवाय, टेकडी परिसरात अनेक ठिकाणी मोठी झाडे उन्मळून पडल्याचेही दिसून येत आहे. मागील बाजूस मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जात असल्याने परिसर अस्वच्छ झाला असून, भटकी कुत्री आणि डुकरांचा वावर वाढला आहे. त्यामुळे पर्यटकांच्या सुरक्षिततेबरोबरच स्वच्छता आणि आरोग्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे.

स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे की, पर्वती टेकडी ही पुण्याची ओळख असलेली महत्त्वाची पर्यटनस्थळांपैकी एक आहे. त्यामुळे येथे येणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी महापालिकेने तातडीने उपाययोजना करणे आवश्यक आहे. वाहून गेलेल्या रस्त्याची दुरुस्ती, पडलेली झाडे हटविणे, कचऱ्याची नियमित विल्हेवाट लावणे आणि धोकादायक भागात सुरक्षा फलक व संरक्षक व्यवस्था उभारणे, या कामांना प्राधान्य द्यावे, अशी मागणी करण्यात येत आहे.

नागरिकांनी इशारा दिला आहे की, वेळेत दुरुस्ती न झाल्यास या मार्गावर गंभीर अपघात होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. त्यामुळे प्रशासनाने तातडीने पाहणी करून आवश्यक दुरुस्तीची कामे हाती घ्यावीत, अशी मागणी आता अधिक जोर धरू लागली आहे.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!