सातारा जिल्ह्यात पोलिसांनी वाहनांवरील काळ्या फिल्मिंगविरोधात सुरू केलेल्या कारवाईदरम्यान एक अजब प्रकार समोर आला. महामार्गावर संशयास्पद धावणाऱ्या कारची तपासणी करताना पोलिसांना आठ महिन्यांपासून बेपत्ता असलेली तरुणी आढळून आली.
वाहनांना काळे फिल्मिंग लावणे कायद्याने गुन्हा मानला जातो. तरीही उन्हाळ्यात वाहनांमध्ये गारवा टिकून राहावा यासाठी अनेक वाहनचालक आपल्या कारला काळी फिल्म लावतात. मात्र, काहीजण या फिल्मिंगचा गैरवापर करत बेकायदेशीर कृत्ये लपवण्याचाही प्रयत्न करतात. त्यामुळे पोलिसांकडून सातत्याने अशा वाहनांवर कारवाई केली जात आहे.
दोन दिवसांपूर्वी सातारा महामार्गावर पोलिसांची तपासणी मोहीम सुरू होती. त्यावेळी संपूर्ण काळे फिल्मिंग लावलेली एक कार पोलिसांच्या नजरेस पडली. संशय आल्याने पोलिसांनी कार अडवली. कारमधून चालक खाली उतरला आणि त्याने तत्काळ दरवाजा बंद केला. यानंतर पोलिसांनी कटरच्या सहाय्याने कारवरील काळे फिल्मिंग काढण्यास सुरुवात केली.
फिल्मिंग काढताच कारच्या आत एक तरुणी तोंडाला स्कार्फ बांधून बसलेली दिसली. पोलिसांनी तत्काळ तिची चौकशी केली. तरुणीला बाहेर बोलावून तिचे नाव, गाव आणि इतर माहिती विचारण्यात आली. तपासादरम्यान संबंधित तरुणी गेल्या आठ महिन्यांपासून बेपत्ता असल्याचे समोर आले. यानंतर पोलिसांनी तरुण आणि तरुणीला पोलिस ठाण्यात नेले. तसेच तरुणीच्या आई-वडिलांनाही बोलावण्यात आले.
मात्र, चौकशीदरम्यान संबंधित तरुणीने आपण त्या तरुणासोबत विवाह केला असल्याचे सांगत लग्नाचे प्रमाणपत्र पोलिसांसमोर सादर केले. त्यानंतर पुढील कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून दोघांनाही जाण्याची परवानगी देण्यात आली. या घटनेची सध्या शहरात खुमासदार चर्चा सुरू आहे.











