July 23, 2026 1:10 am

ग्राहक बनून आली अन् ६.३७ लाखांचे दागिने घेऊन पसार

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

कल्याणजवळील मोहने गावात सोने खरेदीसाठी ग्राहक बनून आलेल्या महिलेने ज्वेलर्स दुकानातून तब्बल ६ लाख ३७ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने घेऊन पलायन केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.या प्रकारामुळे परिसरातील व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

ही घटना कल्याण-कसारा रेल्वेमार्गावरील आंबिवली स्टेशनजवळील एनआरसी गेट परिसरातील किशोर ज्वेलर्स येथे घडली. फिर्यादी किशोर हिराचंद जैन (वय ५३) यांचे हे दुकान आहे. मंगळवारी सकाळी सुमारे ११.३० वाजता एक महिला दुकानात आली आणि स्वतःला ग्राहक असल्याचे भासवत सोन्याचे नेकलेस आणि इतर दागिने दाखवण्याची मागणी केली.

दुकानदार जैन यांनी विश्वासाने तिला अनेक दागिने दाखवले. त्याचवेळी तिने फोन आल्याचा बहाणा करत “मी दोन मिनिटांत येते” असे सांगितले आणि हातातील दागिने घेऊनच दुकानाबाहेर पडली. बाहेर आधीच उभ्या असलेल्या रिक्षात बसून ती काही क्षणांत पसार झाली. बराच वेळ ती परत न आल्याने आपली फसवणूक झाल्याचे दुकानदाराच्या लक्षात आले आणि त्यांनी तातडीने खडकपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

या प्रकरणी खडकपाडा पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम ३०३ (२) अंतर्गत अज्ञात महिलेविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दुकानातील तसेच परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून त्यात आरोपी महिला दागिने घेऊन रिक्षात बसून जाताना स्पष्ट दिसत आहे.

रिक्षाच्या क्रमांकाच्या आधारे आरोपीचा शोध घेण्यात येत आहे. प्राथमिक तपासात ही महिला सराईत गुन्हेगार असण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, रिक्षाचालकाचाही या गुन्ह्यात सहभाग असू शकतो असा पोलिसांना संशय आहे.

कल्याण-डोंबिवली परिसरात ज्वेलर्स दुकानांना लक्ष्य करून चोरी आणि फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने व्यापाऱ्यांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेनंतर पोलिसांनी व्यापाऱ्यांना सतर्क राहण्याचे आणि संशयास्पद व्यक्ती दिसल्यास तात्काळ माहिती देण्याचे आवाहन केले आहे.

 

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!