शहरातील अनेक भागात कचरा उचलला जात नसल्याने जागोजागी कचऱ्याचे ढीग लागल्याचे गाऱ्हाणे सर्वपक्षीय सदस्यांनी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत मांडले. शहरात साठलेला कचरा जाणीवपूर्वक साठविला जात असल्याचा गंभीर आरोपदेखील सभागृहात करण्यात आला.कचरामाफियांकडून हे केले जात असल्याचा आरोप करण्यात आला.
महापालिकेच्या सर्वसाधारण सभेला सुरुवात झाल्यानंतर औचित्याचा मुद्दा म्हणून कचऱ्याच्या समस्येचा प्रश्न उपस्थित केला. महापालिका अधिकाऱ्यांकडे वारंवार तक्रारी करूनही प्रभागातील कचरा उचलला जात नसल्याचे सांगितले. गेल्या आठ ते दहा दिवसांपासून कोथरूड भागातील कचरा उचलला जात नसल्याचे नगरसेविका वासंती जाधव यांनी सांगितले. कचऱ्याचा प्रश्न गंभीर असल्याचे दिलीप वेडे पाटील यांनी सांगितले.
शहरातील कचरा संकलन केंद्रांवर पाच ते सहा दिवस कचरा साचून राहत आहे. महापालिका प्रशासनाकडे कचरा वाहून नेणाऱ्या गाड्यांची संख्या कमी आहे, की शहरातील कचरा प्रकल्प बंद आहेत, असा प्रश्न विरोधी पक्षनेते नीलेश निकम यांनी सभागृहात उपस्थित केला. महापालिका प्रशासनाने यावर खुलासा करावा, अशी मागणी त्यांनी केली.
काँग्रेसचे नगरसेवक अरविंद शिंदे म्हणाले, ‘शहरात कचरा समस्या असल्याचे दाखविले जात आहे का, ५०० टन क्षमतेच्या कचरा प्रकल्पाची निविदा विशिष्ट ठेकेदारालाच मिळावी यासाठी जाणीवपूर्वक ही परिस्थिती निर्माण केली जात आहे. यामध्ये ७०० कोटी रुपयांचा घोटाळा असून कचरामाफिया शहरातील कचरा उचलत नाहीत,’ असा आरोप शिंदे यांनी केला.
‘राज्यात सर्वाधिक टिपिंग शुल्क देऊनही पुणे शहर स्वच्छ राहत नाही. काही लोकप्रतिनिधींच्या नातेवाईकांच्या निविदांना लाभ मिळावा यासाठी हा प्रकार सुरू असल्याचा आरोप प्रशांत जगताप यांनी केला. उरुळी देवाची येथील कचरा प्रकल्पासाठी महापालिकेकडे आवश्यक परवानगी आहे का, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
या वेळी दत्ता बहिरट, गणेश कल्याणकर, महेश वाबळे, योगेश मुळीक, सुरेखा कवडे, अश्विनी लांडगे, योगेश मुळीक, सुरेखा कवडे, अश्विनी लांडगे, कोमल नवले आणि अरुण राजवाडे यांनीही कचरा समस्येबाबत सभागृहाचे लक्ष वेधले.
दरम्यान, केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्यातील विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीची आचारसंहिता लागू केली आहे, अशी माहिती सभागृहाला समजल्यानंतर सभागृहात सुरू असलेली चर्चा थांबवून सभा तहकूब करण्यात आल्याची घोषणा महापौर मंजूषा नागपुरे यांनी केली.











