चिखली घरकुल परिसरातील एका उद्यानात सुरू असलेले धार्मिक बांधकाम थांबविण्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी महापौर मंगला कदम यांनी भाजप आमदार महेश लांडगे यांना भर रस्त्यात अडवून जाब विचारला.
‘विलास लांडे यांचा पराभव करण्यासाठी मी १५ वर्षे तुमचे काम करीत राहिले,’ असा पक्षविरोधी कामाचा जाहीर दाखला देऊन कदम यांनी आमदार लांडगेंना भाजप नगरसेविकेकडून उद्यानातील रोखण्यात आलेल्या बांधकामाबाबत जाब विचारला.
महापालिका ‘प्रभाग ११’मध्ये समाविष्ट असलेल्या एका उद्यानात सुरू असलेल्या धार्मिक बांधकामावरून भाजपच्या स्थानिक नगरसेविका योगिता नागरगोजे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी महापौर मंगला कदम यांच्यात गेल्या काही महिन्यांपासून वाद सुरू आहे.
चिखली-घरकुल परिसरात महापालिकेचा सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प कार्यरत आहे. या प्रकल्पाच्या परिसरात पाणथळ जागा, धावण्यासाठीचा मार्ग (जॉगिंग ट्रॅक) आणि जुनी-नवी मिळून घनदाट झाडी आहे. स्पाइन रस्ता आणि ‘प्रभाग १०’मधील संभाजीनगरच्या मध्यभागी हा परिसर येतो. या जागेवर पाच महिन्यांपासून माजी महापौर कदम यांच्या पुढाकाराने २५ गुंठे क्षेत्रावर धार्मिक स्थळ उभारण्याचे काम सुरू आहे. याला महेश लांडगे यांच्या समर्थक असलेल्या नगरसेविका नागरगोजे यांनी तीव्र विरोध दर्शवला आहे.
गेल्या दोन दिवसांपासून कदम आणि नागरगोजे यांच्यातील हा वाद अत्यंत विकोपाला गेला आहे. शनिवारी नागरगोजे यांनी सुरू असलेल्या कामाला प्रत्यक्ष विरोध केला. त्यानंतर रविवारी कदम यांनी आपल्या समर्थकांसह आमदार लांडगेंना जाब विचारला. लांडगे एका कामगार मेळाव्यासाठी या भागातील सभागृहात आले होते. कार्यक्रम संपवून परतत असताना कदम यांनी त्यांना रस्त्यात रोखून तीव्र शब्दांत सुनावले.
आमदार महेश लांडगे यांना जाब विचारताना कदम अतिशय संतप्त झाल्या होत्या. ‘१५ वर्षे तुमचे काम करीत आहोत. तुम्हाला पूर्वकल्पना देऊन आणि विचारूनच हे काम सुरू केले. तुम्ही मला तसे पत्रही दिले होते. आता तुमची नगरसेविका सांगतेय, की महेशदादांनीच मला हे काम पाडायला सांगितले आहे. मी विलास लांडे यांचा पराभव करण्यासाठी १५ वर्षे तुमच्या पाठीशी उभी राहिले,’ असे कदम म्हणताच लांडगेही स्तब्ध झाले.











