पुणे, दि. १७ मे २०२६: समाजवादी आंदोलन स्थापना दिनानिमित्त राष्ट्र सेवा दल, पुणे जिल्हा आणि ग्रामस्थ भिवडी (ता. पुरंदर) यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्य सेनानी साथी गोपाळराव गायकवाड यांच्या जन्मशताब्दी समारंभाचे आयोजन राष्ट्र सेवा दल, साने गुरुजी स्मारक, पर्वती पायथा येथे करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. विकास देशपांडे होते. ज्येष्ठ काँग्रेस नेते उल्हासदादा पवार प्रमुख पाहुणे म्हणून तर महात्मा फुले समता प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड. मोहन वाडेकर, माणिकबापू झेंडे, बापूसाहेब माहूरकर, मनोहर क्षीरसागर, विलासराव गायकवाड, श्याम निलंगेकर उपस्थित होते.
यावेळी बोलताना उल्हासदादा पवार म्हणाले, “गोपाळराव गायकवाड यांच्यासारखे निष्ठेने आणि विचारांशी बांधिलकी ठेवून काम करणारे कार्यकर्ते आता दुर्मिळ होत चालले आहेत. आज निवडणुका बिनविरोध करण्याची आणि उमेदवार विकत घेऊन सत्ता स्थापन करण्याची प्रवृत्ती वाढत आहे. अशा परिस्थितीत नीती, विचार आणि समाजहित जिवंत ठेवणाऱ्या गोपाळरावांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन नव्या चळवळी उभारण्याची गरज आहे.”
उपस्थित मान्यवरांनीही गोपाळराव गायकवाड यांच्या समाजवादी विचारसरणी, सामाजिक कार्य आणि जनतेप्रती असलेल्या समर्पणाचा गौरव केला. त्यांच्या विचारांचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी समाजातील युवकांनी पुढे येण्याचे आवाहन करण्यात आले.
कार्यक्रमाचे आयोजनामध्ये बाळासाहेब गायकवाड, जगन्नाथ गायकवाड, अरुण गायकवाड, संजय गायकवाड दत्ता पाकिरे, संदेश दिवेकर, प्रशांत दांडेकर, मनीषा पाटील, दिपाली आपटे, अश्विनी सातव डोके यांच्यासह अनेकांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाची प्रस्तावना डॉ. दीपाली गायकवाड यांनी केले, सूत्रसंचालन युवराज सुतार तर आभार दिपाली आपटे यांनी मानले.











