May 14, 2026 1:42 pm

पुणे-पिंपरीतील हवेचा दर्जा सुधारण्यासाठी जिल्हा प्रशासनाचा मास्टरप्लॅन

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

पुणे आणि पिंपरी-चिंचवड या शहरांमधील हवेच्या प्रदूषणाने धोक्याची पातळी ओलांडली आहे. या समस्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी जिल्हा प्रशासनाने आता कंबर कसली आहे.शहराच्या विविध भागांत कार्यरत असलेल्या रेडि-मिक्स काँक्रीट प्लँटमुळे होणारी धूळ आणि वाहतूक कोंडी रोखण्यासाठी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी कठोर नियमावली जाहीर केली असून, पुढील तीन आठवड्यांत या उद्योगासाठी नवीन प्रमाणित कार्यप्रणाली लागू करण्यात येणार आहे.

बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या या उच्चस्तरीय बैठकीत प्रशासनातील बड्या अधिकाऱ्यांसह प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रतिनिधी आणि आरएमसी असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीत केवळ प्रदूषणावरच नाही, तर शहराच्या वाहतूक व्यवस्थेवर होणाऱ्या परिणामांवरही सविस्तर चर्चा करण्यात आली.या मोहिमेचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये पीएमआरडीए , दोन्ही महापालिका, पोलीस प्रशासन आणि प्रदूषण नियंत्रण मंडळ एकत्रितपणे काम करणार आहेत. ‘आम्हाला विकास थांबवायचा नाही, पण तो करताना लोकांच्या आरोग्याशी तडजोड केली जाणार नाही,’ अशा शब्दांत विभागीय आयुक्त नवल किशोर राम आणि महापालिका आयुक्त विजय सूर्यवंशी यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

वाढत्या बांधकामांच्या धुराळ्यामुळे पुणेकरांना श्वसनाचे त्रास जाणवत असल्याच्या तक्रारींमध्ये वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर, प्रशासनाने उचललेले हे पाऊल पुणे आणि पिंपरी-चिंचवडला पुन्हा एकदा श्वास घेण्यायोग्य बनवण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे. पुढील २१ दिवसांत नवीन नियमावली जाहीर होणार आहे. आरएमसी मिक्सर गाड्यांवर लक्ष ठेवण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार असून प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये वाहतुकीला पूर्णतः बंदी घालण्यात येणार आहे.

प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासनाने पुढील ४ ते ६ महिन्यांत पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगर क्षेत्रात प्रदूषणमुक्त ‘कोअर झोन’ निश्चित करण्याची योजना आखली आहे. या झोनमध्ये बांधकामामुळे होणाऱ्या प्रदूषणावर अत्यंत कडक निर्बंध असतील. नागरी आरोग्य आणि पर्यावरणाचे रक्षण करतानाच औद्योगिक विकासाचा समतोल राखणे, हा यामागचा मुख्य उद्देश असल्याचे जिल्हाधिकारी डुडी यांनी स्पष्ट केले.

शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी आरएमसी वाहनांच्या वेळेत मोठे बदल करण्यात आले आहेत. नवीन नियमांनुसार शनिवार, रविवार आणि बुधवारी आरएमसी वाहने नेहमीप्रमाणे धावू शकतील. यामुळे सुट्टीच्या काळात बांधकामाची गती कायम राखता येईल. तर सोमवार, मंगळवार, गुरुवार आणि शुक्रवारी ही वाहने केवळ सकाळी ११ ते दुपारी ५ या वेळेतच चालवता येतील. गर्दीच्या वेळी ही अवजड वाहने रस्त्यावर दिसल्यास कडक कारवाई केली जाईल. केवळ वेळेचे बंधनच नाही, तर या वाहनांवर सीसीटीव्ही कॅमेरे आणि कंपनीची नेमप्लेट असणे अनिवार्य आहे, जेणेकरून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांचा माग काढणे सोपे होईल.

अनधिकृत प्लँटचे धाबे दणाणले-शहरात अनेक ठिकाणी अधिकृत परवानगी न घेता आरएमसी प्लँट उभारण्यात आले आहेत. या प्लँटमुळे मोठ्या प्रमाणात धूळ हवेत मिसळते आणि पाणी प्रदूषणाचे प्रश्नही उद्भवतात. जिल्हाधिकारी डुडी यांनी स्पष्ट निर्देश दिले आहेत की, जे प्लँट प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नियमांचे पालन करत नाहीत किंवा जे अनधिकृत आहेत, ते तात्काळ सील केले जातील. केवळ नियमांचे पालन करणाऱ्या अधिकृत केंद्रांनाच नवीन प्रमाणित कार्यप्रणाली लागू होईपर्यंत काम सुरू ठेवता येईल.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!