May 14, 2026 5:14 am

पुण्यातील ‘पिंक बस’ स्वच्छतागृहे पाणी-ड्रेनेजअभावी बंद

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

पुणे : शहरातील महिलांसाठी उभारण्यात आलेल्या ‘पिंक बस’ स्वच्छतागृहांच्या सुविधांचा प्रत्यक्षात महिलांना उपयोग होत नसल्याचे चित्र समोर आले आहे. जंगली महाराज रस्त्यावरील छत्रपती संभाजी उद्यानाच्या प्रवेशद्वाराजवळ उभारण्यात आलेले महिलांसाठीचे स्वच्छतागृह बंद अवस्थेत असल्याचे निदर्शनास आले असून, याबाबत पुणे महानगरपालिका आयुक्त मा. नवलकिशोर राम यांच्याकडे तातडीने कारवाईची मागणी करण्यात आली आहे.

महिलांसाठी सुरक्षित, स्वच्छ आणि सुसज्ज सार्वजनिक स्वच्छतागृहे उपलब्ध व्हावीत या उद्देशाने पुणे मनपाने शहरात ‘पिंक बस’ संकल्पना राबवली आहे. विशेषतः गणेशोत्सव, पालखी सोहळा, दिवाळी यांसारख्या गर्दीच्या काळात तसेच महिला पोलिस व सर्वसामान्य महिलांची होणारी गैरसोय लक्षात घेता ही योजना महत्त्वाची मानली जात आहे. मात्र प्रत्यक्षात अनेक बसेस अद्याप वापराविना उभ्या असल्याने प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील एकूण ११ बसेस “पे अँड यूज” तत्वावर मे. सारा प्लास्ट प्रा. लि. या संस्थेकडे चालवण्यासाठी देण्यात आल्या आहेत. संबंधित संस्था या बसेस विविध ठिकाणी उभ्या करून महिलांकडून प्रती वापर पाच रुपये शुल्क आकारणार असून, त्यातून स्वच्छतागृहांची देखभाल व व्यवस्थापन केले जाणार आहे. या प्रकल्पासाठी संबंधित संस्थेकडून सुमारे ९० लाख रुपयांचा खर्च केला जात आहे. हा करार पुढील पाच वर्षांसाठी करण्यात आला आहे.

सध्या शनिवारा वाडा परिसरातील एक बस कार्यरत असून महिलांकडून तिचा वापर होत आहे. मात्र छत्रपती संभाजी उद्यान आणि कात्रज उद्यान येथील दोन बसेस पाणी व ड्रेनेज कनेक्शन नसल्याने बंद अवस्थेत उभ्या असल्याची माहिती समोर आली आहे. इतर काही बसेस अद्याप तयार करण्याचे काम सुरू असून त्या पुढील काही कालावधीत वापरात येणार आहेत.

याबाबत आयुक्तांना दिलेल्या निवेदनात तातडीने सर्व संबंधित बसेसना पाणी, ड्रेनेज व आवश्यक नागरी सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे. महिलांसाठी मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे ही केवळ सोयीची बाब नसून शहराच्या संवेदनशील आणि सुसंस्कृत प्रशासनाची ओळख असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

महिलांच्या दैनंदिन अडचणी लक्षात घेता मनपाने या ‘पिंक बस’ सुविधा त्वरित सुरू करून शहरातील नागरिकांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!