डोंबिवली पश्चिमेतील सर्वाधिक वर्दळीच्या पंडित दिनदयाळ रस्त्यावरील सम्राट चौक भागात रस्ता आणि पदपथ यांचा आधार घेऊन विनापरवानगी गॅस सिलिंडरचा सार्वजनिक ठिकाणी वापर करून मिसळ पावची विक्री करणाऱ्या एका विक्रेत्यावर विष्णुनगर पोलिसांनी ज्वालाग्रही वस्तू सार्वजनिक ठिकाणी ठेऊन लोकांच्या जीविताला धोका निर्माण केल्याबद्दल गुन्हा दाखल केला आहे.
गेल्या वर्षभरात विष्णुनगर पोलिसांनी रस्ते, पदपथ, चौक अडवून वडापाव, मिसळपाव, चायनिज विक्री करणाऱ्या सुमारे ७० हून अधिक विक्रेत्यांवर कारवाई केली आहे.
आता पालिकेबरोबर पोलीसही फेरीवाले, हातगाडी, टपरी चालकांविरूध्द कारवाई करत असल्याने नागरिक समाधान व्यक्त करत आहेत. पंडित दिनदयाळ रस्त्यावरील सम्राट चौक हा सर्वाधिक वर्दळीचा रस्ता आहे. या भागातून माणकोली पुलाकडे येजा करणारी वाहने धावतात. या चौकात फळ, भाजी विक्रेत्यांचा बाजार भरतो. तरीही काही हातगाडी चालक या चौकात हातगाडी उभी करून गॅस सिलिंडरचा नियमबाह्य वापर करून त्यावर वडापाव आणि खाद्य पदार्थ तयार करून त्याची विक्री करतात.
ग्राहकही या हातगाड्यांसमोर आपल्या दुचाकी, मोटारी उभ्या करून वाहतुकीला अडथळा होईल अशा पध्दतीने उभ्या करतात. त्यामुळे सम्राट चौक नेहमीच वाहन कोंडीने गजबजलेला असतो. स्थानिक नगरसेवकही या बेकायदा हातगाडी चालकांविरूध्द आवाज उठवत नसल्याने प्रवासी, नागरिक नाराजी व्यक्त करत आहेत. या हातगाडीवर पालिकेच्या ह प्रभागातील फेरीवाला हटाव पथकाकडून कारवाई होत नाही म्हणून इतर फेरीवालेही या हातगाडीच्या बाजुला हातगाड्या लावून व्यवसाय करतात.
गेल्या आठवड्यात विष्णुनगर पोलीस ठाण्याचे हवालदार राजू जाधव वरिष्ठ पोलीस निरीक्षक राम चोपडे यांच्या आदेशावरून आपल्या हद्दीत गस्त घालत होते. यावेळी सकाळच्या गर्दीच्या वेळेत पंडित दिनदयाळ रस्त्यावरील सम्राट चौकात सुनील विठ्ठल चव्हाण (५५) हे हातगाडी लावून त्याच्या बाजुला विना परवानगी गॅस सिलिंडर ठेऊन ग्राहकांना मिसळ पाव तयार करून देत होते. सार्वजनिक वाहतुकीला अडथळा होईल अशा पध्दतीने ही हातगाडी उभी होती. तसेच मानवी जीविताला धोका निर्माण होईल, नागरिकांच्या सुरक्षिततेचा विचार न करता चव्हाण यांनी गॅस सिलिंडरचा सार्वजनिक ठिकाणी वापर केला होता.
त्यामुळे हवालदार राजू जाधव यांनी दोन पंच सोबत घेतले. या हातगाडीचा पंचनामा केला. आणि विनापरवाना नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण होईल अशा पध्दतीने गॅस सिलिंडरचा सार्वजनिक ठिकाणी वापर केला म्हणून भारतीय न्याय संहितेच्या कलम २०२३ प्रमाणे २८७ कलमाने मिसळ पाव विक्रेता सुनील चव्हाण यांच्या विरूध्द गुन्हा दाखल केला आहे.











