नसरापूर येथे चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करताना आरोपीने चिमुरडीच्या घशात मोजा कोंबल्याने तिचा श्वास रोखला गेल्यामुळे तिचा मृत्यू झाल्याचे शवविच्छेदन अहवालातून स्पष्ट झाले.चिमुरडीच्या शरीरावर दुखापतींच्या खुणा आढळल्या असून, नाकातून रक्तस्राव झाल्याचाही उल्लेख अहवालात करण्यात आला आहे.
अवघ्या तीन वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिचा खून केल्याप्रकरणी आरोपी भीमराव प्रभाकर कांबळे (वय ६५, रा. भोर) याला गुरुवारी पोलिस कोठडीची मुदत संपल्याने ‘व्हिडिओ कॉन्फरन्सिंग’द्वारे न्यायालयात हजर करण्यात आले.
एक मे रोजी घडलेल्या या घटनेनंतर संपूर्ण जिल्ह्यात संतापाची लाट उसळली होती. चिमुरडीची बॉडी आढळल्यानंतर तिचे शवविच्छेदन ससून रुग्णालयात करण्यात आले. त्याचा अहवाल नुकताच पोलिसांना प्राप्त झाला आहे. अहवालानुसार, चिमुरडीच्या घशात जबरदस्तीने मोजा कोंबल्यामुळे तिचा श्वास अडला. श्वास घेता न आल्याने गुदमरून तिचा मृत्यू झाला. वैद्यकीय अहवालात ‘अस्फिक्सिया’ म्हणजेच श्वसन बंद पडल्याने मृत्यू झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. तसेच तिच्या शरीरावर विविध दुखापतींच्या खुणाही आढळून आल्या आहेत. घटनेनंतर तिच्या नाकातून रक्त येत असल्याचेही तपासात समोर आले आहे.
सुरक्षेच्या कारणास्तव आरोपीला न्यायालयात प्रत्यक्षात हजर न करता या प्रकरणाची सुनावणी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे घ्यावी, अशी मागणी करणारा अर्ज सरकार पक्षातर्फे न्यायालयात करण्यात आला. त्यावर, दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून न्यायालयाने परवानगी दिली. त्यानुसार, आरोपीला ‘व्हीसी’द्वारे न्यायालयासमोर हजर करण्यात आले.
‘नसरापूर येथे नराधमाच्या लैंगिक अत्याचारात जीव गमावलेल्या चिमुकलीच्या शरीरावर जखमा आढळल्या असून, त्या बोथट व टणक हत्याराने केल्याचे शवविच्छेदन अहवालात म्हटले आहे. या नराधमाने कोणते हत्यार वापरून मुलीचा खून केला, याचा तपास करून हत्यार हस्तगत करायचे आहे,’ अशी माहिती पोलिसांनी न्यायालयात दिली.
गुन्हा केल्यानंतर आरोपी खांद्यावर बोचके टाकून पळून जात असल्याचे सीसीटीव्ही चित्रीकरणात दिसले असून, त्याचीही चौकशी आरोपीकडे करायची असल्याचेही पोलिसांनी सांगितले. दरम्यान, विशेष न्यायाधीश एम. जी. चव्हाण यांनी आरोपीच्या पोलिस कोठडीत १२ मेपर्यंत वाढ केली.
पुणे ग्रामीण पोलिस अधिकाऱ्यांनी न्यायालयासमोर शवविच्छेदन अहवाल, आरोपीच्या वैद्यकीय चाचणीचा अहवाल, लैंगिक सक्षमता चाचणी अहवाल, सीसीटीव्ही चित्रीकरण, घटनास्थळाचा पंचनामा आदी कागदपत्रे सादर केली. आरोपीच्या पोलिस कोठडीत वाढ करण्याची मागणी विशेष सरकारी वकील अरुंधती ब्रह्मे यांनी केली. तक्रारदारातर्फे ॲड. मनीष पाडेकर यांनी वकीलपत्र सादर केले. सरकार व बचाव पक्षाचा युक्तिवाद ऐकून न्यायालयाने आरोपीच्या पोलिस कोठडीत आणखी पाच दिवसांची वाढ केली.
नसरापूरमधील चिमुकलीवरील अत्याचार व खून प्रकरणी राज्य सरकारने तातडीने पावले उचलली आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार नाशिकचे जिल्हा सरकारी वकील अजय मिसर यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीस राज्यपालांची मंजुरी मिळाली आहे. अजय मिसर यांना गाजलेल्या व संवेदनशील खटल्यांचा मोठा अनुभव असून, अनेक महत्त्वाच्या प्रकरणांत त्यांनी काम पाहिले आहे.











