जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील एका तरुणीवर नऊ वर्षे अत्याचार करून तिला धर्मांतरासाठी ब्लॅकमेल केल्याचा प्रकार उघडकीस आला होता. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
या प्रकरणातील मुख्य आरोपीवर कठोर कारवाईची मागणी होत असतानाच, संतप्त जमावाने आरोपीच्या घराला आग लावली. या घटनेमुळे परिसरात मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. या तरुणीने तक्रारीत नेमकं काय म्हटलं आहे, नक्की तिच्यासोबत घडलं काय जाणून घेऊयात…
भोकरदन तालुक्यातील वालसावंगी येथे पारध पोलीस स्टेशनच्या हद्दीत हा प्रकार घडला आहे. 25 वर्षीय तरुणीने दिलेल्या माहितीनुसार, 2016 साली ती नवव्या इयत्तेत शिकत असताना आरोपीने लपून तिचे अंघोळ करताना फोटो काढले होते. तरुणीने दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी शेख इम्रान शेख हबीबने ती एकटी घरात अंघोळ करत असताना तिचे नग्न/अश्लील फोटो आणि व्हिडिओ काढले. त्यानंतर या फोटोंच्या आधारे मागील 10 वर्षांपासून शेख इम्रान शेख हबीब तिला ब्लॅकमेल करुन तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार करत होता. फोटो व्हायरल करण्याची धमकी देत पीडितेवर आरोपीकडून सतत दबाव टाकण्यात आला.
आरोपीने पीडितेवर केवळ शारीरिक अत्याचारच केला नाही, तर हिंदू धर्म सोडून इस्लाम स्वीकारण्यासाठीही तिच्यावर दाबाव टाकला. 2018 मध्ये आरोपीच्या कुटुंबीयांनी वडील शेख हबीब, आई शेख बानू, भाऊ शेख जुनेद यांनी पीडितेला बुरखा घालायला लावला. तसेच कुराण पठण, नमाज शिकवण्याचा प्रयत्नही आरोपीच्या कुटुंबियांकडून करण्यात आल्याचं तक्रारीत म्हटलं आहे “हिंदू धर्मापेक्षा आमचा धर्म चांगला” असे म्हणत धर्मांतरासाठी सतत पीडितेला आरोपीच्या कुटुंबियांकडूनही प्रवृत्त करण्यात आलं. पीडित तरुणीने कुटुंबासह गाव सोडले तरी आरोपीने छळ चालू ठेवल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
पीडित तरुणीने पारध पोलीस ठाण्यात तक्रार दिली. अल्पवयीन असताना गुन्हा घडला असल्याने पोलिसांनी पॉस्को कायद्याबरोबरच इतर कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. मुख्य आरोपी शेख इम्रान आणि त्याचा भाऊ शेख जुनेद यांना अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरु आहे.
संतप्त जमावाने आरोपीचं घर जाळल्यानंतर जामावाचा उद्रेक पाहता घटनास्थळी बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. आरोपीला फाशीची शिक्षा आणि कठोर शासन व्हावे यासाठी आज विविध सामाजिक तसेच हिंदू संघटनांनी आक्रोश मार्चाचे आयोजन केले आहे. गावातील हनुमान मंदिर येथून या मोर्चाला सुरुवात होणार आहे.











