पुणे जिल्ह्याच्या जुन्नरमध्ये पुन्हा एकदा रक्ताचा सडा पडलाय. इथं बिबट्याच्या भीतीनं नागरिकांच्या काळजाचा ठोका पुन्हा एकदा चुकलाय. जुन्नरमध्ये नुकत्याच घडलेल्या थरारक घटनेमध्ये बिबट्याने 10 वर्षांच्या चिमुरड्यावर मृत्यूची झडप घातली, पण काळ बनून आलेल्या बिबट्यासमोर एक ‘बाप’माणूस ढाल बनून उभा राहिला.रक्ताचा थरार, काळजाचा ठोका चुकवणारा पाठलाग आणि मृत्यूला दिलेलं आव्हान, अशी ती घटना होती.
पुणे जिल्ह्यात बिबट्यांचा वावर, मानवी वस्त्यांमध्ये होणारे त्यांचे हल्ले या आणि अशा घटना अद्यापही कमी झालेल्या नाहीत. ज्यामुळं गावखेड्यांमध्ये नागरिकांना जीव मुठीत घेऊन दिवस काढावे लागत आहेत. याच दहशतीच्या वातावरणात थरकाप उडवणारी आणखी एक घटना नुकतीच समोक आली.
जुन्नरमध्ये आता सूर्यास्त झाला की काळोखासोबतच मृत्यूचा वावर सुरू होतो. शिरोली बुद्रूक गावातली ही शांत रात्र अशाच एका भयानक संकटाची साक्ष देणार होती. 10 वर्षांचा गणेश आपल्या वडिलांसोबत दुचाकीवरून घराकडे निघाला होता. रस्ता ओळखीचा होता, पण काळ दबा धरून बसला होता.
रस्त्याच्या कडेला दबा धरून बसलेल्या नरभक्षक बिबट्याने कसलाही विचार न करता दुचाकीवर झडप घातली. टोकदार दात आणि अणकुचीदार पंज्यांनी गणेशच्या पायाचा लचका तोडला. रक्ताचा सडा पडला आणि चिमुरड्याच्या किंकाळीने आसमंत हादरला!
डोळ्यासमोर स्वतःचा मुलगा मृत्यूच्या विळख्यात होता. पण म्हणतात ना, बापाचं हृदय हे वज्राहून कठीण असतं. एका बाजूला बिबट्याचा हल्ला आणि दुसऱ्या बाजूला पोटच्या गोळ्याचा जीव! वडिलांनी क्षणाचाही विलंब न करता एका हाताने मुलाला घट्ट मिठी मारली आणि दुसऱ्या हाताने दुचाकीचा ॲक्सिलेटर मारला अन् वाऱ्याच्या वेगाने गाडी पळवत त्यांनी मृत्यूला मागे टाकलं.
गणेश आज मृत्यूच्या दारातून सुखरूप परतलाय, पण जुन्नरमधील वन्यजीव आणि मानव संघर्ष आता टोकाला पोहोचला आहे. प्रत्येक घराबाहेर आता भीतीचं सावट आहे. वनविभाग पिंजरे लावतोय, गस्त घालतोय, पण बिबट्याचे हल्ले थांबण्याचं नाव घेत नाहीत. आज गणेश वाचला, पण उद्याचा असं कोणी दुसरं सुरक्षित आहे का? हाच प्रश्न आता प्रशासनाला विचारला जातोय. त्यामुळं जुन्नरमध्ये बिबट्याचं हे तांडव थांबणार कधी? नरभक्षक बिबट्या जेरबंद होणार की अजून एखाद्या निष्पापावर हल्ला केला जाणार? हे आता पाहणं महत्त्वाचं ठरेल.











